सरस प्रदर्शन हा महिलांना सक्षम करणारा उपक्रम!

मंत्री गोविंद गावडे : गोवा मिनी सरस २०२४ प्रदर्शनाचे रवींद्र भवन मडगाव येथे उद्घाटन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21 hours ago
सरस प्रदर्शन हा महिलांना सक्षम करणारा उपक्रम!

सरस प्रदर्शनाच्या समाराेप प्रसंगी बोलताना मंत्री गोविंद गावडे. बाजूला इतर मान्यवर.

मडगाव : सरस प्रदर्शन हे केवळ वस्तू विक्रीसाठी नाही, तर महिलांना सक्षम करणारा उपक्रम आहे. महिलांना आर्थिक स्वावलंबन देत स्वाभिमान देणारे सरस प्रदर्शन आहे. यातून महिला आपली कला लोकांपुढे ठेवतात व तळागाळातील महिलांना पुढे येण्याची संधी मिळते. मेहनतीशिवाय काहीही मिळत नाही. वस्तूची गुणवत्ता चांगली राखत ग्राहकाला पुन्हा खरेदीसाठी येण्यास भाग पाडणारी कला येथे दिसून येते, असे प्रतिपादन मंत्री गोविंद गावडे यांनी केले.
गोवा मिनी सरस २०२४ हे प्रदर्शन ९ ते २० डिसेंबर या कालावधीत रवींद्र भवन, मडगाव येथे खुल्या जागेत भरवण्यात आले होते. यात ८० स्टॉल्स व १२० महिला उद्योजकांनी तयार केलेले साहित्य व कलाकृतींचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली. यातून १४ लाख ३७ हजारांचा व्यवसाय झाला. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाकडून दरवर्षी सरस प्रदर्शन आयोजित केले जाते. यावर्षी गोव्यातील ग्रामीण भागातील कलाकार व लघु उद्योजकांसाठी गोवा मिनी सरस प्रदर्शनाचे आयोजन केले होते. ग्रामीण कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, त्यांनी केलेल्या कलाकृतींची विक्री झाल्याने त्यांनाही आर्थिक लाभ झाला आहे. या प्रदर्शनाच्या कालावधीत सायंकाळी ६ ते ९.३० वा. या वेळेत लोकनृत्य, ऑर्केस्ट्रा, नृत्य व गायन स्पर्धा, फॅन्सी ड्रेस व इतर कार्यक्रमांचे आयोजन केले होते व त्यालाही प्रतिसाद लाभला. याशिवाय कलाकारांना सहकार्य करणार्‍या बँका व आर्थिक साक्षरता करण्यासाठी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आयुर्वेदाची माहिती, हस्तकलेतून तयार केलेल्या वस्तू, कोल्हापुरी चप्पल, कुणबी साडीसह अन्न व औषध खात्याचेही स्टॉल्स होते. या प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमाला मंत्री गोविंद गावडे, आमदार दिगंबर कामत, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दामोदर बोरकर यांच्यासह प्रकल्प संचालक दीपाली नाईक उपस्थित होत्या.
दीपाली नाईक यांनी या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. आमदार कामत यांनी यापुढेही मडगावात अशाप्रकारची महिलांना प्रोत्साहन देणारी प्रदर्शने व्हावीत, असे सांगितले.
व्यावसाय करताना लाज बाळगू नका : गावडे
मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले की, कोणताही व्यवसाय करण्यास लाज बाळगू नये. जी यशस्वी झालेली व्यक्तीमत्वे आहेत, त्यांनी कधीही कोणताही व्यवसाय करण्यास लाज बाळगलेली नाही व केवळ ध्येय गाठण्याचे उद्दिष्ट ठेवत काम केले. माझ्याकडून काम होणार का अशी आशंका मनात न ठेवता महिलांनी पुढे यावे. कधीही निराशा बाळगू नका. व्यवहारिक दृष्टिकोण ठेवावा, मार्केटचा अंदाज घ्यावा व गुणवत्तापूर्ण वस्तू मार्केटला आणल्यास ग्राहक कधीही खरेदीसाठी याच ठिकाणी येतील, असेही त्यांनी सांगितले.
20go7