खा सुकामेवा

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
13 hours ago
खा सुकामेवा

चिवडा खाताना त्यातील एखादा काजूचा तुकडा किंवा हलव्यातील बदाम वेचून खायला आपल्याला आवडतं ना? बदाम, पिस्ता, काजू, जर्दाळू, अक्रोड, खजूर, खारीक, चारोळ्या, मनुका, दुधिच्या बिया, कलिंगडाच्या बिया इ. अनेक प्रकार सुक्यामेव्यामध्ये आहेत. 

मनुका सोडून इतर सर्व सुक्या मेव्यातील पदार्थ पचवायला जास्त वेळ व जास्त पचनशक्ती लागते. आणि ही जास्तीची पचनशक्ती आत्ता सुरू असलेल्या हिवाळ्यात आपल्या शरीरात असते म्हणून सुकामेवा वर्षभर रोज न खाता या थंडीच्या दिवसात सुक्यामेव्याचे वेगवेगळे पदार्थ खावे. 

सुकामेवा खाण्याचे फायदे

सुकामेवा शरीरातील उष्णता वाढवतो. यातील मनुका आणि खजूर मात्र गुणाने थंड आहेत. 
सुकामेवा शरीराला ताकद देतो.
शरीरात स्निग्धता म्हणजे लुब्रिकेशन निर्माण करतो.
शरीरातील ऊर्जा वाढवतो.
काळा खजूर व काळ्या मनुका रक्त वाढवतात.
खारीक हाडं मजबूत बनवते.
अक्रोड बुद्धी वाढवते.
चारोळ्या केसांच्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत.

हा सगळा सुकामेवा कसा व किती प्रमाणात खावा?

एकावेळी २-३ बदाम, १ अक्रोड, २-४ काजू, १-२ खजूर, १-२ खारीक, ५-६ काळ्या मनुका या प्रमाणात रोज एक एक प्रकार असं हिवाळ्यात खाऊ शकता.
जास्त प्रमाणात खाल्ले असता पचन नीट होणार नाही आणि खाल्लेले पदार्थ व्यवस्थित पचले नाहीत तर ते शरीरात वेगवेगळे आजार निर्माण करतात.
डिंक, सुकामेवा घालून बनवलेले लाडू हिवाळ्यात खाऊ शकता.
खिरीत काजू, बदाम, चारोळ्या घालून खाऊ शकता.
वेगवेगळ्या प्रकारचा हलवा उदा. मूगडाळ हलवा, गाजर हलवा, कोहळ्याचा हलवा यामध्ये सुद्धा सुकामेवा घालून खाऊ शकता. 
चुरमुऱ्यांचा चिवडा, मखाना चिवडा किंवा पोह्यांच्या चिवड्यात घालून सुद्धा सुकामेवा खाऊ शकता. 
हा सुकामेवा शक्यतो सकाळी, भूक कडकडून लागली असता खावा म्हणजे पचन व्यवस्थित होऊन त्यातील पोषणमूल्ये आपल्याला मिळतील. 

समजलं ना आता??? बुद्धी वाढावी म्हणून रोज बदाम, अक्रोड खाऊन फायदा नाही, त्यासाठी ते अक्रोड व बदाम योग्य ऋतूत, योग्य प्रमाणातच खावे लागतात. आणि हं कधीही खाल्ले तर गरजेपेक्षा जास्त वजन वाढेल किंवा अजीर्ण होऊन त्रास होईल. ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींपर्यंत पोहचवायला विसरू नका.


- वैद्य कृपा नाईक,
आयुर्वेदाचार्य