धाडसी मुलं

Story: छान छान गोष्ट |
13 hours ago
धाडसी मुलं

एका गावात अभय आणि अभिर नावाचे दोघे मित्र रहात होते. ते एकाच इयत्तेत शिकत होते एकाच क्लासमध्ये एकाच बाकावर बसत, एकत्र डबा खात, एकत्र खेळत अशी दोघांची घट्ट मैत्री होती. त्या दोघांना कशाची म्हणजे कशाचीच भीती वाटत नसे. दोघे कशाला आणि कुणालाच घाबरत नसत. अगदी धाडसी निडर होते. अंधार, भुते-खेते, पडका वाडा, जुनी विहीर, घनदाट जंगल त्यातली श्वापदे, वादळवारा, पाऊस, विजा यांची त्यांना भीती नव्हती. 

त्या गावात एकदा अशी बातमी पसरली की कुणीतरी एक लांब पांढऱ्या केसांचं भूत गावात रात्रीच्या काळोखात येतं आणि कुणी लहान मूल बाहेर खेळत असेल किंवा बाजेवर निजलं असेल तर त्याला उचलून घेऊन जातं आणि खरोखरीच हल्लीच गावातली दोन मुले गायब झाली होती, अगदी पाच वर्षाच्या आतली मुले कुठेतरी गायब झाली होती. त्यांच्या घरचे लोक किती शोधण्याचा प्रयत्न करत होते पण काहीच सुगावा लागत नव्हता. गावाचे पोलीस पाटील ही त्या कामात मदत करत होते. पण मुले काही सापडत नव्हती. 

आता गावात भीतीचे वातावरण तयार झाले होते. कुणी रात्रीचं घराबाहेर पडायला घाबरत होते. भुताची सर्वांनाच भीती बसली होती. पण असं भिऊन किती दिवस राहायचं त्याचा छडा लावलाच पाहिजे असं अभय अभिरला वाटत होतं. गावातले काही लोक त्या लांब केसांच्या भुताला दुरून पाहिल्याचं सांगत होते लांब लांब पांढऱ्या केसांच्या बटा असलेली एक आकृति बघता बघता गायब होते. असं त्यांनी वर्णन केलं होतं. त्या दोघांनी एके रात्री घरातून कुणाला न कळू देता बाहेर पडून त्या भुतावर वॉच ठेवायचं ठरवलं. त्या प्रमाणे गावाच्या वेशीवर एक उंच शिळा होती त्यावर उभं राहून ते भूत आधी टेहळणी करून मग गावात शिरायचे. हे त्यांच्या लक्षात आलं, त्याला अडकवण्याचा त्यांनी प्लान केला. 

अंधार दाटून आल्यावर दोघांनी मोठे फेव्हीकॉलचे डबे घेतले आणि ज्या शिळेवर ती आकृति उभी रहात होती त्यावर भरपूर फेव्हीकॉल लावून ठेवले कुणाला नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी दबा धरुन भुताची वाट पहात बसले. थोड्या वेळाने त्यांना कसलीशी चाहूल लागली भूत त्या शिळेवर चढले होते, चढताना त्याच्या हाताला ओलसर लागले त्याला वाटले पाणी असेल ते पुसायला त्याने आपले हात डोक्यावर पुसले पण हाताला लागलेले फेव्हीकॉल केसाना चिकटून बसले आता त्याच्या लांब केसांच्या बटाही चिकटल्या त्याला हालता येईना अभय अभिर न भिता पुढे आले. त्यांनी उरलेलं फेव्हीकॉलही त्याच्या अंगावर ओतलं त्याचे डोळे, पापण्या सारे फेव्हीकॉलने चिकटून बसलं. त्याला काही दिसेना. 

मुलांनी बरोबर दोन काठ्या आणल्या होत्या त्याने त्या भुताला बडवायला सुरुवात केली तो मारू नका मारू नका म्हणू लागला तेवढ्यात गावातली माणसे गोळा झाली. त्यांनी टॉर्च आणले होते त्याच्या उजेडात त्यांना ते भूत नाही तर कुणी माणूस आहे हे कळले. तसा वेश करून मुले पळवून नेत होता. शेजारच्या गावातला एक गरीब माणूस पैशाच्या लोभाने मुले पळवायचे काम करत होता, त्याच्या मदतीने पोलिसांनी मुले पळवणाऱ्या टोळीचा छडा लावला. 

हरवलेली दोन्ही मुले त्यांच्याकडून परत मिळवली पण असा धाडसीपणा अभय आणि अभिरने दाखवला म्हणूनच ते शक्य झालं होतं. गावाच्या पोलीस पाटलांनी तसेच शाळेकडूनही त्या दोघांचा सत्कार करण्यात आला. सगळ्या गावाला त्या मुलांविषयी त्यांच्या धाडसीपणामुळे त्यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक वाटले.


-प्रतिभा कारंजकर