हे सर्वजण रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये बेशुद्धावस्थेत सापडले होते. अन्य २० जण जखमी झाले असून, आतापर्यंत ३० जणांना वाचवण्यात यश आले आहे.
चेन्नई : तामिळनाडूतील दिंडीगुल येथील एका खासगी रुग्णालयात लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू झाला. सर्वजण हॉस्पिटलच्या लिफ्टमध्ये बेशुद्धावस्थेत सापडले. यामध्ये एका अल्पवयीनाचाही समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना काल रात्री ९ वाजता घडली. त्रिची रोडवरील ऑर्थोपेडिक केअर सिटी हॉस्पिटलच्या रिसेप्शन परिसरात ही आग लागली. थोड्याच वेळात ही आग संपूर्ण इमारतीत पसरली. घटनेच्या वेळी रुग्णालयात ५० हून अधिक रुग्ण होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीच्या घटनेची माहिती मिळताच तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. रुग्णांना १० रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. लिफ्टमध्ये सापडलेल्या सर्वांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. इतर रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.