त्याच्या सुरक्षेत तैनात असलेल्या आयआरबी पोलीस कॉन्स्टेबलच्या सहाय्याने केले पलायन. हा पूर्वनियोजित कट असल्याचा पोलिसांचा संशय
पणजी : जमीन हडप प्रकरणी गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कोठडीत असलेला सराईत गुन्हेगार सिद्दीकी उर्फ सुलेमान खान (५४, रा. म्हापसा) हा पसार झाल्याची धक्कादायक बातमी सकाळी ५ वा. घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे त्याच्या सुरक्षेत तैनात असलेल्या आयआरबी पोलीस कॉन्स्टेबल अमित नाईक याने पलायन करण्यात मदत केली. सदर घटनेची वाच्यता होताच विशेष चौकशी पथक आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या घटनेनंतर गुन्हा शाखेच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पूर्व नियोजित कट आखत संशयिताने पलायन केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी पहाटे २.३० ते ३.०० च्या सुमारास घडली. संशयित कॉन्स्टेबलने सुलेमान खानला आधी कोठडीतून बाहेर काढले. नंतर सुलेमानला आपल्याच दुचाकीवर बसवून त्याने पलायन केले. मिळालेल्या माहितीप्रमाणे हे दोघे कोणत्या दिशेने गेलेत याचा राज्य पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमाने माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. संशयित सिद्दीकी(सुलेमान) खान यास मागे १२ नोव्हेंबर रोजी एसआयटीने हुबळीहून अटक केली होती. गेल्या चार वर्षांपासून तो फरार होता. संशयितावर जमीन हडप प्रकरणे, खून, खूनी हल्ला व फसवणूक या सारखे देशभरात एकूण १५ गुन्हे नोंद आहेत. यात गोव्यात ७, दिल्लीत १, हैदराबादमध्ये ४ व पुणे येथे नोंद झालेल्या ३ गुन्ह्यांचा समावेश आहे. एकतानगर म्हापसा येथे १, गवळीमळ तिसवाडी येथे ३ व थिवी येथे २, अशा एकूण ६ मालमत्ता त्याने हडप केलेल्या आहेत. चौकशी दरम्यान त्याने आणखी चार मालमत्तांची नावे उघड केली होती. म्हापसा, बेळगाव सारख्या ठिकाणी संशयिताने जमीन खरेदी-विक्रीमध्ये फसवणूक केलेली आहे.
सिद्दीकी खानच्या नावे सात बँक खाती होती. त्यात किरकोळ रक्कम होती. तर संशयित वापरत असलेल्या एका महिलेच्या बँक खात्यात १.३६ कोटी रूपये होते. हे खाते गोठवण्यात आले आहे. संशयित आरोपी मध्यवयीन महिलांशी मैत्री करत होता व सदर महिलांना विश्वासात घेऊन त्यांचे बँक खाते वापरून त्यामार्फत आर्थिक व्यवहार करत होता. गोव्यासह दिल्ली, हैदराबाद, हुबळी, धारवाड, पुणे सारख्या भागातील एकूण ३५ महिलांची त्याने गुन्हेगारी कारवायांत मदत घेतलेली आहे. या सर्व महिलांसह त्याच्या इतर साथीदारांची चौकशी करून नंतर पुढील कारवाई करण्यात येईल. संशयिताकडे बोगस वाहन चालक परवाना आणि पॅन कार्ड सापडले असून ही कागदपत्रे त्याने कुठून मिळवली आहेत, याचाही तपास सुरू आहे
संशयिताचे पालक मूळचे शिमोगा कर्नाटकमधील असून त्याचा जन्म म्हापशात झालेला आहे. सुरूवातीला तो गवंडी काम करायचा, नंतर कंत्राटदार व त्यानंतर प्रॉपर्टी डीलर बनला. बनावट मुखत्यारपत्र करून मालमत्तेचे विक्रीपत्र बनवणे. एकच जमीन वेगवेगळ्या लोकांना विकणे, असे फसवेगिरीचे प्रकार त्याने सुरुवातीस अवलंबले. हणजूण येथील लुईझा व तेरशेला फर्नाडिस यांच्यासोबत संशयिताने मालमत्ता विक्रीचा ७७ लाखांचा व्यवहार केला होता. त्यासाठी त्याने १२ लाख रूपये रक्कम आगाऊ दिली होती. हा व्यवहार फसल्याने त्याने नंतर दोघींवर खूनी हल्ला केला होता. त्यात लुईझा हिचा मृत्यू झाला होता.
म्हापशातील अॅड. ज्ञानेश्वर कळंगुटकर यांच्यावरही त्याने हल्ला केला होता. अॅड. कळंगुटकर यांनी कर्ज म्हणून घेतलेले ४० लाख रूपये ते परत करत नसल्याने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता, असा दावा पोलीस चौकशीवेळी संशयिताने केला आहे. दरम्यान २०१८ मध्ये हैद्राबाद येथे जुन्या नोटा बदलण्याच्या व्यवहारात पोलिसांनी त्याला अटक केली होती. काही प्रकरणात अटक टाळण्यासाठी संशयिताने सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांशी देखील संपर्क साधला होता. २००४ पासून संशयिताचा बनावटगिरी व फसवणूकीच्या गुन्ह्यांत सक्रिय सहभाग आहे.