केपे पोलिसांकडून गुन्हा नोंद : २०२१ मधील घटना
मडगाव : शेल्डे येथील अभिषेक हिरेमठ (२७, रा. शेल्डे केपे) याने २०२१ मध्ये असोल्डा येथील लक्ष्मीकांत शिकेरकर यांच्या घराची कौले काढत आत प्रवेश केला. सात हजार रुपयांची चोरी केल्यानंतर त्याने तक्रारदारावर पेट्रोल ओतले. त्यांना पेटवण्याचा प्रयत्न फसला होता. याप्रकरणी दक्षिण गोवा जिल्हा न्यायालयाने संशयित अभिषेक याला दोषी ठरवले आहे. त्याला १७ डिसेंबर रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.
घरात शिरून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शेल्डेतील संशयित अभिषेक हिरेमठ याला दक्षिण गोवा जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश शेरीन पॉल यांच्या न्यायालयाने दोषी ठरवले. अभिषेक याने लक्ष्मीकांत शिकेरकर हे त्याला दहावीत शिकवायचे त्यावेळी त्यांनी त्याला मारलेले होते. त्याचाच बदला घेण्यासाठी त्यांना मारण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस चौकशीत सांगितले होते. अभिषेक याने ८ डिसेंबर २०२१ रोजी शिकेरकर यांच्या घराची कौले काढून घरात प्रवेश केला. घरात शिरताना त्याने ५ लिटर पेट्रोल, लायटर, चाकू व दांडा सोबत घेतला होता. घरात गेल्यावर त्याने शिकेरकर यांच्या पत्नीच्या पर्समधून ६,९९० रुपयांची चोरी केली. त्यानंतर शिकेरकर यांच्या अंगावर पेट्रोल ओतले. त्यावेळी त्यांना जाग आल्याने अभिषेक याचा त्यांना जाळण्याचा प्रयत्न फसला.
संशयिताला १७ रोजी सुनावणार शिक्षा
केपे पोलिसांनी घरफोडी करणे, चोरी करणे, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अभिषेक हिरेमठ याच्याविरोधात गुन्हा नोंद केला होता. दक्षिण गोवा जिल्हा न्यायालयातील सुनावणीवेळी संशयित अभिषेक याला न्यायालयाने दोषी ठरवलेले आहे. त्याला १७ डिसेंबर रोजी सुनावणीवेळी शिक्षा सुनावली जाणार आहे.