सुनीता राॅड्रिग्जच्या बँक लाॅकरमधून १६ लाख रुपयांचे २३६ ग्रॅम दागिने जप्त

१३० कोटींच्या गुंतवणूक घोटाळाप्रकरणी गुन्हा शाखेची कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13th December, 12:25 am
सुनीता राॅड्रिग्जच्या बँक लाॅकरमधून १६ लाख रुपयांचे २३६ ग्रॅम दागिने जप्त

पणजी : फातोर्डा मडगाव ते लंडनपर्यंत प्रकरणाची व्याप्ती असलेले आणि १३० कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्यातील संशयित मायरन राॅड्रिग्ज याची पहिली पत्नी सुनीता राॅड्रिग्ज हिच्या बँक लाॅकरातून १६ लाख रुपयांचे २३६ ग्रॅम दागिने जप्त केले. ही कारवाई गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेचे निरीक्षक तुषार लोटलीकर याच्या नेतृत्वाखाली पथकाने गुरुवारी केली.
जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) संशयित मायरन राॅड्रिग्ज याच्यासह इतरांवर २०२३ मध्ये दोन गुन्हे दाखल केले होते. त्यात ईओसीने राॅड्रिग्ज आणि त्याची पत्नी दीपाली परब हिला संशयित केले होते. दोघांनी गोव्यातील ३८ जणांची २५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
याची दखल घेऊन ईओसीने अधिक चौकशी केली असता, मायरनने २००९ ते १७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत १३० कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार केल्याचे समोर आले. याशिवाय मायरनने आयडीलीक गोवन गेटवेज कंपनीत ३.२५ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, ईओसीने कंपनीचे संचालक नॉलन आंताव, ज्योकिम रोझारियो पिरीस, विजय जाॅयल, नवनिक परेरा आणि सुशांत घोडगे (पेडणे) यांना संशयित करून चौकशी सुरू केली आहे.
दरम्यान, ईओसीने संशयित मायरनसह त्याची पहिली पत्नी सुनीता आणि दुसरी पत्नी दीपाली परब मिळून तीन बँक लाॅकरातून ३ कोटी रुपयांचे ४.१२५ किलो दागिन्यांसह मालमत्तेचे अस्सल कागदपत्रे जप्त केली होती. याच दरम्यान वरील प्रकरण गोवा पोलिसांनी गुन्हा शाखेकडे वर्ग केले. गुन्हा शाखेचे अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी तपास सुरू केला. दरम्यान गुन्हा शाखेने संशयित मायरन याची पहिली पत्नी सुनीता राॅड्रिग्ज हिला अटक केली. निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने दोन सरकारी कर्मचाऱ्यांसह गुरुवारी सकाळी मडगाव येथील आयसीआयसीआय बँकेतील लाॅकरची झडती घेतली. विभागाने त्यातून १६ लाख रुपयांचे २३६ ग्रॅम दागिने जप्त केले आहे.      

हेही वाचा