कंत्राटदार कंपनीचा दावा : सुकूर पंचायत सभागृहात आराखड्याचे सादरीकरण
पर्वरी उड्डाण पुलाचे प्रात्यक्षिक सादर करताना राजदीप भट्टाचार्य.
म्हापसा : पर्वरी येथील सहापदरी उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाल्यावर वाहतूक सुरळीत होईल. दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड तयार होतील. हा पूल ७५ ते शंभर वर्षे टिकेल, असा विश्वास आरआरएसएम इंफ्रा प्रा. लि. कंपनीचे राजदीप भट्टाचार्य यांनी व्यक्त केला.
बुधवारी सकाळी सुकूर पंचायत सभागृहात उड्डाण पुलाच्या आराखडा सादरीकरण बैठकीत ते बोलत होते. स्थानिकांसाठी या उड्डाण पुलाच्या बांधकामाबाबत जनजागृती तसेच माहिती मिळावी म्हणून पंचायतीतर्फे या बैठकीचे आयोजन केले होते. कंत्राटदार कंपनीचे भट्टाचार्य यांनी उड्डाण पुलाच्या बांधकाम आराखड्याचे प्रात्यक्षिक सादरीकरण केले. तर त्यांना भंवर मीना यांनी सहकार्य केले.
या सहा पदरी उड्डाण पुलाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. हा प्रकल्प वर्षभरात म्हणजेच डिसेंबर २०२५ पर्यंत पुर्णत्वास येईल. गेल्या ९ डिसेंबरपर्यंत ५३० पैकी २९० खांबांच्या पायाचे (पाईल्स) काम पूर्ण झाले आहे. तसेच ८८ पैकी २५ मुख्य खांब (पिअर्स) उभारले गेले आहेत. एकूण १४३१ कास्टिंग (सेगमेंट) पैकी ११२ पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत ६१३ झाडांपैकी ४४७ झाडे तोडण्यात आली आहेत, अशी माहिती भट्टाचार्य यांनी दिली.
या सहा पदरी उड्डाण पूल अटल सेतूपासून ३०० ते ४०० मीटर अंतरावर मॅजेस्टिक हॉटेल जवळ उतरेल. पर्वरी व आसपासच्या रहिवाशांना उड्डाण पुलावरून जायचे असल्यास मॅजेस्टिक हॉटेल जवळ यावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
रहिवासी डॉ. एम.बी.प्रभू. यांनी सूचना केली की हे उड्डाण पूल थेट अटल सेतूला जोडले गेले पाहिजे. कारण मॅजेस्टिक हॉटेलजवळ गोंधळ निर्माण होऊन वाहतूक कोंडी होईल.
सामाजिक कार्यकर्ते सॉर्टर डिसोझा म्हणाले की, महामार्गाच्या सुकूर ते पर्वरी दरम्यान अनेक चारचाकी आणि दुचाकी शोरूम आहेत. दुचाकी आणि चारचाकी गाड्या घेऊन येणारे कंटेनर वाहने उड्डाण पुलाचा वापर करणार नाहीत. तर त्यांना सर्व्हिस रोडचा वापर करावा लागेल. यामुळे अवजड वाहनांची वाहतूक कमी होणार नाही. हे उड्डाण पूल पर्वरीतील सहिवास्यांच्या ऐवजी रिअल इस्टेट आणि लॉजिस्टिक हबच्या फायद्यासाठी बनवला गेला आहे, असा दावा त्यांनी केला.
घरे माखली धुळीने...
या सादरीकरणावेळी धुळीच्या प्रश्नावर चर्चा झाली. धुळीच्या प्रदूषणामुळे नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागत असल्याचे सुकूर व पर्वरीतचील लोकांनी नमूद केले. घराच्या खिडक्या बंद करूनही आतील टेबल खुर्च्यांवर धूळ साचत आहे. साबांखाकडून रस्त्यावर पाणी शिंपडले जात असले तरीही धुळीचे प्रदूषण कमी होत नाही, असे रहिवाशांनी सांगितले.
धुळीचे प्रदूषण होत असल्याचे भट्टाचार्य यांनी मान्य केले. हे कमी करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. रस्त्यावर पाणी शिंपडण्यासाठी दररोज ३ ते ४ पाण्याचे टँकर वापरले जात आहेत. मात्र शिंपडलेले पाणी सुकल्यानंतर पुन्हा धुळ होते. पाण्याचे टँकर आणखी वाढवून धुळेचे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे भट्टाचार्य यांनी सांगितले.
जलवाहिन्यांची काळजी घ्या!
या खोदकामामुळे जलवाहिन्या फुटल्या जातात. वेळीच त्या दुरूस्त केल्या जात नसल्याने दिवसभर नळाला पाणी मिळत नाही. त्यामुळे काळजीपूर्वक काम करावे, अशी सूचना रहिवाशांनी दिली.