आय. ए. एस. मुलाखत कशी होते?

मुलाखत ही तुमच्यावर दबाव आणण्यासाठी नसून तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी असते. इंग्रजी बोलणे आवश्यक आहेच, परंतु जर नाही बोलता आले तर अडत नाही.

Story: यशस्वी भव: |
08th December, 03:30 am
आय. ए. एस.  मुलाखत कशी होते?

विद्यार्थी आय.ए.एस., आय.पी.एस. किंवा यू.पी.एस.सी. च्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला की तो मुलाखतीसाठी पात्र ठरतो. ही मुलाखत नवी दिल्ली येथील यू.पी.एस.सी. मुख्यालयात होते. मेन्स परीक्षा ही दीर्घोत्तरी परीक्षा असते. यात एकूण सात पेपर्स असतात. प्रत्येक पेपरसाठी २५० गुण असतात. जनरल स्टडिजचे ४, तसेच वैकल्पिक असे २, तसेच १ अॅप्टीट्युट संद‌र्भाचा पेपर असतो. यामध्ये, राजकारण, अर्थशास्त्र, गणित, इतिहास, भूगोल, पंचायतराज, भारताचा स्वातंत्र्यसंग्राम, इतिहास, चालू घडामोडी, आंतराराष्ट्रीय घडामोडी, पर्यावरण, भाषा, कायदा, तंत्रज्ञान, संसदीय कार्यपद्धती इत्यादी विषयांवर प्रश्न असतात. यामध्ये आपली स्वत:ची मते लिहावी लागतात. 

हे सर्व पेपर्स व्यवस्थितपणे माजी सनदी अधिकाऱ्यांकडून तपासले जातात व योग्य ते मुल्यांकन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपण काय लिहितो आहे ते नीट वाचले जाणार आहे याचे भान ठेवावे. यातून विषयाचा अभ्यास, सखोलता, व्याप्ती तसेच सुस्पष्टपणा नीट लक्षात येतो. पास होऊन पुढील मुलाखतीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्लीहून बोलावण्यात येते. मुख्य परीक्षा राज्यातील निवडक केंद्रामध्ये होते परंतु मुलाखत दिल्ली येथे घेतली जाते. मुलाखतीमध्ये जी भाषा (medium of language) निवडलेली असते, यू.पी.एस.सी प्रिलियमच्या वेळेस त्या भाषेतून संवाद साधायचा असतो. जर मुलाखत इंग्रजीमधून देत असाल, तर तुमची  इंग्रजी भाषेवरची पकड लक्षात घेतली जाते. 

जर एखाद्या विद्यार्थ्याला एखादा विषय त्याच्या मातृभाषेत अथवा हिंदीमध्ये सांगायचा असेल, तर तशी परवानगी घेऊन मुलाखत मनमोकळेपणाने देता येते. तुमचा मुद्दा किंवा विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कश्या पद्धतीने देता हे मुख्यत्वे मुलाखतकार तपासात असतात. इंग्रजी बोलताना जर अडखळायला झाले तर काही अडत नाही, परंतु मुद्दा पटवून देता आला पाहिजे. मुलाखत ही तुमच्यावर दबाव आणण्यासाठी नसून तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी असते. इंग्रजी बोलणे आवश्यक आहेच, परंतु जर नाही बोलता आले तर अडत नाही. हे विद्यार्थ्यांनी आधिच ध्यानात घ्यावे व तयारी करावी. 

मुलाखत घेणारे एक पॅनेल असते. गप्पांमधून विषयांतर करत करत चर्चेच्या माध्यमातून प्रश्न विचारले जातात. शांतपणे आपले विचार ठामपणे मांडता येणे गरजेचे. तसेच माहिती नसलेल्या ठिकाणी प्रामाणिकपणा दाखवणे आवश्यक आहे. आणि मुलाखातकारांकडून तुमचे हे गुण ते तपासले जातात.

थोडक्यात जणू तुम्ही आय.ए.एस, आय.पी.एस. झालेलेच आहात असे समजून उत्तरे दिल्यास योग्य ती उत्तरे सुचू शकतात. तुम्ही अधिकारी म्हणून सक्षम आहात की नाही हे यातून तपासले जाते. ३०० गुण या मुलाखतीसाठी असतात.


अॅड. शैलेश कुलकर्णी,
कुर्टी - फोंडा
(लेखक नामांकित वकील आणि करिअर समुपदेशक आहेत.)