प्राण्यांचे हक्क जपूया

१० डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय प्राणी हक्क दिवस साजरा केला जातो त्यानिमित्त लिहिलेला लेख.

Story: साद निसर्गाची |
08th December, 03:27 am
प्राण्यांचे हक्क जपूया

मागील आठवड्यात माणसांनी गजबजलेल्या पर्वरी शहरातील रस्त्यावर सांबर फिरत असल्याची वार्ता राज्यभर गाजली. ज्या वन्यजीवाचे घर जंगल. त्यांनी जंगले नष्ट झाल्यामुळे ग्रामीण भागात प्रवेश करावा; हाहा म्हणता वन्य जीवाचा अधिवासच नष्ट व्हावा व त्यांनी शहरी भागात प्रवेश करावा एवढी वाईट परिस्थिती आज वन्यजीवावर ओढवली आहे. याबाबत वन्यमित्र, निसर्गप्रेमी, पर्यावरणतज्ञ चिंता व्यक्त करत असतानाच फोंड्यातील कुंकळी गावाच्या लोकवस्तीत बिबट्याचे पिल्लू आढळल्याची वार्ता धडकली. हिवाळ्यात कोसळणारा धो धो पाऊस व शहरी भागात भटकणारी श्वापद ही वादळापुर्वीची शांतताच जणू!

वन्यजीवाचा अधिवास नष्ट केल्यामुळे रानटी जनावरांना पुरेशी खावड मिळत नाही व त्यामुळेच त्यांना लोकवस्तीच्या दिशेने फिरकावे लागते. मानव-वन्यजीव सह-अस्तित्वाचे तीन-तेरा वाजत असतानाच भटक्या कुत्र्यांपासून रक्षण करण्यासाठी प्रसंगावधान राखून ज्या शिताफीने इंदू गावडे या महिलेने त्या बिबट्याच्या पिल्लाला बांबूच्या टोपलीखाली बंदिस्त केले ते पाहता तिचे कौतुक करावे तेवढे थोडेच! 

आज मानव-प्राणी सह अस्तित्व कुठे तरी हरवत आहे. एकेकाळी घराचे अंगण शेणाने सारवले जात असे. शेणाने सारवलेल्या या अंगणात पांढऱ्या शुभ्र तांदळाच्या पिठाने रांगोळी काढली जात असे. यामुळे घराबाहेरील सूक्ष्मजंतू तांदळाचे पीठ खाण्यासाठी उंबरठ्या बाहेरच स्थिरावत. असे केल्याने सुक्ष्मजंतूंसाठी खाणही उपलब्ध होत असे व माणसाला सूक्ष्मजंतूपासून धोकाही निर्माण होत नसे. अशा प्रकारे मानव-वन्यजीव सह-अस्तित्व टिकून राहत असे. आजच्या काळात अंगण व रांगोळी दोन्ही कृत्रिम बनलेले आहेत.

एकेकाळी रात्र होताच सारे दिवे विझवले जायचे. अशावेळी एका भागातून दुसऱ्या भागात स्थलांतर करणाऱ्या पक्षांसाठी, समुद्री कासवांसाठी आकाशातील चांदणे / चंद्राचा प्रकाश हा दिशादर्शकाचा एकमेव स्त्रोत असत. आज विद्युतीकरणामुळे रात्री अपरात्री देखील दिवे चालू असतात. परिणामी, स्थलांतर करणारे पक्षी व कित्येक समुद्री कासव आपली मुळ दिशा भटकतात व अन्नाअभावी मृत पावतात. आजकाल घराला परावर्तित खिडक्या बसवल्या जातात. आरशासारख्या दिसणाऱ्या ह्या खिडक्यांमध्ये आकाश/वनस्पतीचे प्रतिबिंब दिसते. त्यामुळे पक्षी गोंधळातात. प्रजनन हंगामात पक्षी काचेतील स्वत:च्या प्रतिबिंबावर हल्ला करू शकतात. प्रतिबिंबित खिडकीवर चोच मारल्याने पक्ष्यांना इजा होते. यामुळे त्यांना प्राणही गमवावा लागू शकतो. 

बहुतेक वेळा पर्यटनासाठी जाणारे पर्यटक माकडांना केळी, चिकू, संत्री, सफरचंद यासारखी फळे खायला टाकतात. दुसऱ्या बाजूला तेच पर्यटक बागेत सहलीला गेले असता एखादा माकड त्यांच्या हातातून किंवा बॅगेतून खाण्याची वस्तू घेऊन पसार झाला तर संतापाने त्याच्यावर दगड-धोंडे फेकून मारतात. माकडांना बाहेरच्या पदार्थांची सवय मुळात लावली कुणी? हे मात्र अशावेळी ते सपशेल विसरतात. हल्ली लोकांमध्ये पाळीव मांजरांना किंवा कुत्र्यांना खाण्यासाठी 'प्रक्रिया केलेले अन्न' म्हणजेच 'कॅटफूड' किंवा 'डॉगफूड' घालण्याची एक वेगळीच क्रेझ दिसून येत आहे. प्रक्रिया केलेले अन्न खाण्याची चटक लागल्यामुळे पाळीव प्राणी आपला मूळ धर्म, म्हणजे शिकार करणे विसरत चालला आहे. प्रक्रिया केलेले अन्न खाणारी मांजर  पाल, झुरळ, सरडा, उंदीर व लहान-सहान किटकांना धड ढुंकूनही पाहत नाही अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. यामुळे अन्नसाखळी असंतुलित होत आहे.

धरणे, रेल्वेमार्ग, विमानतळे, राष्ट्रीय महामार्ग यासारखे प्रकल्प उभारण्यासाठी वनाचे मोठ्या प्रमाणात विभाजन केले जाते. यामुळे प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होतो. मानवी वापरासाठी झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल केल्यामुळे नैसर्गिक अधिवासाची मोठ्या प्रमाणात हानी होते. शेतीचा विस्तार, मानवी वस्ती, प्राण्यांची शिकार, जमीन रुपांतरण यांसह अनेक कारणांमुळे मानव आणि प्राण्यांमध्ये संघर्ष निर्माण होत आहे. मानव-प्राणी सह-अस्तित्वाला चालना देण्यासाठी लोकांमध्ये जागृकता निर्माण करणे, वन्यजीवाचे संरक्षण करणे, नियम आणि कायद्याचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. 

पर्वरी शहरात भटकणारे ते सांबर आता पणजी नजीकच्या ताळगाव भागात निदर्शनास आल्याचे येथील ग्रामस्थ सांगत आहेत. कुंकळीच्या लोकवस्तीत सापडलेले बिबट्याचे ते पिल्लू जन्माला येऊन दोन-एक आठवडेच झाले असतील असा रान खात्याचा अंदाज आहे. विकासाच्या मार्गात गुरफटलेले जग व तंत्रज्ञानाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या माणसामुळे मानव-वन्यजीव सह-अस्तित्व दिवसेंदिवस संपुष्टात येण्याच्या मार्गावर वाटचाल करत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

स्त्रिग्धरा नाईक

(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)