इफ्फी दर्शन

Story: माझी डायरी |
08th December, 03:24 am
इफ्फी दर्शन

त्या दिवशी मी शाळेत गेलो, तर बघितलं की सगळेजण बाहेर बसले होते. मी त्यांना विचारलं की तुम्ही इथे का बसला आहात? मित्र म्हणाले की आम्ही इफ्फीला जाणार आहोत. आम्ही सगळे आनंदात होतो. पणजीला कला अकादमी जवळ मुलांसाठी छोट्या तंबूसारखे थिएटर होते. त्यात मोठी स्क्रीन होती त्यावर आम्ही एक अॅनिमेशन फिल्म बघितली. तिचं नाव होतं ‘आय लव्ह ताजमहल’ मग आम्ही ‘कस्तुरी’ ही टेलीफिल्म बघितली.

ती टेलीफिल्म संपल्यावर जेव्हा आम्ही जाणार होतो तेव्हा आमच्या समोर एक माणूस आला त्याच्याबरोबर एक मोठा मुलगा होता तो माणूस म्हणाला त्या कस्तुरी फिल्ममध्ये जो तुम्ही गोपी पाहिला तो हाच. आम्ही खूप खुश होतो. मी त्याचा ऑटोग्राफ घेतला. मग त्याने सांगितलं की गोपीनाथ हे नाव फिल्म मध्ये दिलं होतं. त्याचं खरं नाव वेगळं आहे. मग आम्ही व्हीआर डोळ्यांना लावला. आम्हाला व्हीआरबद्दल काहीही माहित नव्हतं. ते डोळ्यांना लावून आम्ही खोल समुद्रात पोहोचलो. आम्हाला एक मोठा व्हेल दिसला. कचरा दिसला, जो लोक समुद्रात फेकतात. आम्ही एका जेलीफिशवर उभे होतो. आम्हाला त्या मोठ्या व्हेलने गिळून टाकलं. पण आम्ही जिवंत होतो. आम्ही टाकलेल्या कचऱ्यामुळे घाण झालेला समुद्र आम्ही पाहिला. घरी पण मला ते सर्व डोळ्यांसमोर दिसत होते. गोपीची गोष्ट आठवत होती.

 अरेच्चा!! मी एक किस्सा सांगायला विसरलो! जेव्हा ‘कस्तुरी द मस्क’ फिल्मला गोपी मिळत नव्हता,  डायरेक्टर म्हणाले हे ऑडिशन बंद करूया. तेव्हा एक मुलगा धावत आला व म्हणाला की, “सर सर माझे ऑडिशन घ्या ना, माझी परीक्षा होती म्हणून मला उशीर झाला.” मग सरांनी त्याची ऑडिशन घेतली व तो मुलगा गोपीनाथ म्हणून निवडला. त्याचं नाव आहे गोपी म्हणजेच सम्राट सोनवणे. हा गोपी मला खूप आवडला. डायरेक्टर आणि गोपी आमच्याशी खूप बोलले. माझा सगळा दिवस आनंदात गेला.


नाव : अभिमन्यू पां. गांवकर

इयत्ता : ४थी
शाळा : सरकारी प्राथमिक विद्यालय, धुळापी खोर्ली