चटकदार लोणचं

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
08th December, 04:21 am
चटकदार लोणचं

‘लोणचं’ हा शब्द ऐकताच तोंडाला कसं पाणी सुटतं... आपल्यापैकी बऱ्याच जणांना जेवणासोबत चटकदार लोणचं खायला खूप आवडतं कारण लोणचं जेवणाची चव वाढवतं. वेगवेगळ्या प्रकारची लोणची बनवली जातात. गोड, आंबट, तिखट, खारट, कडू अश्या विविध चवींचं लोणचं बनवलं जातं. 

लिंबू, कैरी, आवळा, कारलं, ओली हळद, गाजर, फ्लॉवर, काकडी, खजूर इ. अनेक पदार्थांचे लोणचे घरी बनवता येते. त्याचप्रमाणे माईन मुळा, लसूण, ओले मिरे, मिरची, करंबल, बांबूचे कोंब यांचे सुद्धा चविष्ट लोणचे बनवले जाते. 

हळद, मेथी, हिंग, मोहरी हे मसाले लोणचे बनवताना वापरले जातात, ज्यामुळे लोणच्याला औषधी गुण प्राप्त होतात. पण हे लोणचे मात्र घरी बनवलेले असावे. बाजारात मिळणाऱ्या लोणच्यामध्ये कृत्रिम रंग, प्रिजर्वेटीव्हज् असतात, शिवाय तेल सुद्धा चांगल्या प्रतीचे न वापरल्यामुळे असे लोणचे खाल्ले असता अनेक त्रास होऊ शकतात. 

घरगुती लोणचे खाण्याचे अनेक फायदे आहेत. 

लोणचे बनवताना मेथीचे दाणे वापरले जातात जे कडू असल्यामुळे पोटातील जंतांचा त्रास, कफाचे आजार, सूज, अपचन इ. कमी करण्यास मदत करते.

 लोणच्यातील हिंग पोटातील गॅस कमी करण्यास, भूक वाढवण्यास, पचन क्रिया सुधारण्यास व जंत कमी करण्यास मदत करतो. 

तापासारखा आजार होऊन गेला की जीभेची चव जाते, अश्यावेळी आहारात पेज व तोंडी लावायला लिंबाच्या लोणच्याची आंबट गोड फोड घेतली असता चव वाढते व जेवण्याची इच्छा निर्माण होते. 

लोणचे किती प्रमाणात खावे? 

आंबट गोड पदार्थ हे बऱ्याच जणांच्या आवडीचे त्यामुळे काही काही मुलं तर म्हणे वाटी वाटीभर लोणचं खातात, काही जण चपातीबरोबर भाजीसारखं लोणचं खातात आणि मग त्यांना वेगवेगळे त्रास सुरू होतात. जसे की तोंड येणे, छातीत जळजळ होणे, शीच्या जागी जळजळ होणे किंवा तिथून रक्त येणे, केस पिकणे इ. आणि मग वैद्य त्यांना लोणचे खाऊ नका असा सल्ला देतात. इथे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लोणचे वाईट नाही. ते बाजारातून आणले असेल व खूप जास्त प्रमाणात सतत खाल्ले तर त्रास करणारे ठरते. 

लोणचे हे ताटात डाव्या बाजूला, एक छोटा चमचाभर इतक्या प्रमाणातच वाढावे. या प्रमाणात लोणचे खाल्ल्याने त्रास होणार नाही आणि आरोग्यदायी फायदेसुद्धा मिळणार. 

आणि हं तुम्हाला एक सिक्रेट सांगते, तुमच्या घरी जर कोणाला डायबिटीस आजार असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा एक खास लोणचे उपयुक्त आहे. आत्ता बाजारात आवळा आणि ओली हळद मिळते हे दोन्ही पदार्थ डायबिटीस आजारामध्ये औषध म्हणून उपयोगी आहे. त्यामुळे आईला आवळा व हळदीचे मेथी दाणे घालून लोणचे बनवायला सांगा.

मस्त आंबट गोड लोणच्यांचा आस्वाद घ्या, पचन शक्ती सुधारा आणि निरोगी रहा.


- वैद्य कृपा नाईक,
आयुर्वेदाचार्य