बार्देश : हडफडेत नाईट क्लबच्या कामगारांना मारहाण; सराईत गुन्हेगार केल्फा फर्नांडिसला अटक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
07th December 2024, 04:04 pm
बार्देश : हडफडेत नाईट क्लबच्या कामगारांना मारहाण; सराईत गुन्हेगार केल्फा फर्नांडिसला अटक

म्हापसा:   बागा - हडफडे येथे वगालूम्मे नाईट क्लब जवळ क्लबच्या कामगारांना शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी केल्फा उर्फ क्लिओफस फर्नांडिस (४५, रा. बागा- हडफडे) यास  हणजूण पोलिसांनी अटक केली. मारहाणीची ही घटना शुक्रवारी ६ रोजी संध्याकाळी ५ च्या सुमारास बागा खाडीजवळील स्टाफ रूमजवळ घडली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात पोलिसांत अनेक गुन्हे नोंद आहेत. 



प्राप्त महितीनुसार, संशयित आरोपी केल्फा हा वगालूम्मे नाईट क्लबच्या स्टाफ रूमजवळ गेला व तिथे असलेल्या क्लबच्या कामगारांना शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी रितू राज मंडल (३०, रा. मूळ बिहार), त्याचे सहकारी गोविंद मगर, अमर शर्मा (दोघेही महाराष्ट्र), स्टीव्ह (मणीपूर) व विवेक कुमार (झारखंड) यांना लाथा बुक्क्यानी व लाकडी दंडुक्याने मारहाण केली. यात हे सर्व पाचही जण जखमी झाले. जखमींवर कांदोळी आरोग्य केंद्रात उपचार करून डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिले.



घटनेची माहिती मिळाल्यावर हणजूण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व संशयित आरोपी केल्फा विरूध्द भा.न्या.सं.च्या ३५२, ११५(२), ११८(१) कलमांन्वये गुन्हा नोंदवून अटक केली.  पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंगाडी करीत आहेत.


हेही वाचा