सेरुला कोमुनिदाद समितीच्या निवडणुकीत लोबो पॅनलची सत्ता

विरोधी गटाचा आक्षेप : हात उंचावून मतदान घेतल्याने नाराजी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th January, 11:59 pm
सेरुला कोमुनिदाद समितीच्या निवडणुकीत लोबो पॅनलची सत्ता

सेरुला कोमुनिदाद व्यवस्थापन समितीवर निवडून आलेले पदाधिकारी.

म्हापसा : कोमुनिदाद कायद्यानुसार सेरुला कोमुनिदादची निवडणूक मतपत्रिकेने घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, रविवारी पीठासीन अधिकाऱ्यांकडून ही निवडणूक हात उंचावून घेण्यात आल्याने विरोधींनी आक्षेप नोंदवला असून या अवमान प्रकरणी उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. तर या निवडणुकीत अॅश्ली लोबो यांच्या गटाने बाजी मारत सर्व पदांवर विजय मिळवला.
सेरुला कोमुनिदाद व्यवस्थापन समितीचे निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये अॅश्ली लोबो यांना ६०२ मते मिळाली. अॅटर्नी पीटर मार्टिन्स यांना ५३५ मते, तर खजिनदार गोविंदराव विठोबा शेट तानावडे यांना ३७४ मते प्राप्त झाली. तसेच उपाध्यक्ष आलेक्स परेरा (४७५ मते), सहअॅटर्नी डिओनिसिओ त्रिनिदाद (३७९ मते) व अनंत श्यामसुंदर सिनारी (३४८ मते) हे या समितीवर निवडून आले.
विरोधी पॅनलचे उमेदवार अॅड. शंकर फडते (४४ मते), मारियो आथाईद (२३ मते), दिलीप म्हांबरे (१६ मते), सॅनफोर्ड फाचो (२८ मते), महेश म्हांबरे (२५ मते) व विल्बर टिकलो (१२ मते) हे पराभूत झाले.
रविवारी १२ रोजी कडेकोट पोलीस बंदोबस्तात पर्वरीतील गाडगे महाराज सभागृहात ही निवडणूक पार पडली. मतदार गावकार आणि भागधारकांना निवडणूकस्थळी मोबाईल फोन नेण्यास मनाई करण्यात आली होती. तसेच सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत या मतदारांना सभागृहात प्रवेश देण्यात आला व त्यानंतर प्रवेशास प्रतिबंध केला.
पीठासीन अधिकारी असलेले तिसवाडीचे मामलेदार कौशिक देसाई यांनी हात वर करून मतदान होणार असल्याची घोषणा केली व उमेदवारांची नावे उच्चारली. हात उंचावून केलेल्या मतदानाचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले व नंतर निकाल जाहीर करण्यात आला.
उच्च न्यायालयापेक्षा कोमुनिदाद प्रशासक मोठे?
- निवडणूक निकालानंतर विरोधी गटातील अध्यक्षपदाचे उमेदवार अॅड. शंकर फडते म्हणाले, उच्च न्यायालयाने कोमुनिदाद कायद्याच्या कलम ४८ नुसार सेरुला कोमुनिदादला मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते. तरीही पीठासीन अधिकाऱ्यांनी निवडणुकीसाठी हात उंचावण्याच्या पद्धतीचा अवलंब केला. त्यांना याबाबत विचारले असता कोमुनिदाद प्रशासकांनी अशा पद्धतीने निवडणूक घेण्याचा सल्ला दिला असल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे अॅड. फडते म्हणाले.
- या संदर्भात आम्ही महसूल खात्याचे अवर सचिव, उत्तर गोवा जिल्हाधिकारी आणि कोमुनिदाद प्रशासक यांना लेखी स्वरूपात आक्षेप नोंदवला आहे. न्यायासाठी आपण उच्च न्यायालयातही याचिका दाखल करणार, असे अॅड. फडते यांनी सांगितले.

हेही वाचा