सेथुरामन, टोलोगोन, स्लिझेव्हस्की, नितीन ४ गुणांसह संयुक्त आघाडीवर

गोवा आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धा : गोव्याचा एथन ३.५ गुणांसह शर्यतीत कायम

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
17 hours ago
सेथुरामन, टोलोगोन, स्लिझेव्हस्की, नितीन ४ गुणांसह संयुक्त आघाडीवर

पणजी : ग्रँडमास्टर एस.पी. सेथुरामन (भारत, २५६०), आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू टोलोगोन तेगिन सेमेटेई (किर्गिस्तान, २३५१), आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू अलेक्झांडर स्लिझेव्हस्की (रशिया, २३४०) आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू एस. नितीन (भारत, २३३८) हे तिसऱ्या स्व. श्री मनोहर पर्रिकर गोवा आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धा २०२५ मध्ये चार फेऱ्यांनतर प्रत्येकी ४ गुणांसह संयुक्त आघाडीवर आहेत.
अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (एआयसीएफ) च्या नेतृत्वाखाली गोवा बुद्धिबळ संघटनेने आयोजित केलेली ही स्पर्धा डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम, तालीगाव येथे सुरू आहे. आघाडीच्या खेळाडूंमध्ये प्रत्येकी ३.५ गुणांसह १० खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये ग्रँडमास्टर दिप्तयन घोष (आरएसपीबी, २५६९), ग्रँडमास्टर अलेक्सी फेडोरोव्ह (बेलारूस, २४०९), ग्रँडमास्टर मित्रभा गुहा (डब्ल्यूबी, २५०९), ग्रँडमास्टर इथन वाझ (गोवा, २४१२), एफएम न्गुयेन क्वोक हाय (व्हिएतनाम, २४१८), ग्रँडमास्टर आरोन्याक घोष (आरएसपीबी, २५४४), ग्रँडमास्टर सिद्धार्थ जगदीश (सिंगापूर, २५१६), ग्रँडमास्टर न्गुयेन डुक होआ (व्हिएतनाम, २३५९), सायंतन दास (डब्ल्यूबी, २४३४) आणि सरवण कृष्णन पी. (केव्हीबी, २२४४) यांचा समावेश आहे. हे खेळाडू उत्तम फॉर्ममध्ये आहेत आणि आगामी फेऱ्यांमध्ये अव्वल स्थानांना आव्हान देण्यासाठी स्पर्धा करत आहेत. आणखी सहा फेऱ्या खेळायच्या आहेत.
आयएम टोलोगोन तेगिन सेमेटेई (किर्गिस्तान) आणि आयएम नितीन एस. (तामिळनाडू) यांनी चौथ्या फेरीत उल्लेखनीय विजय मिळवले. सेमेटेईने आयएम श्रीहरी एल.आर. (तामिळनाडू, २४९४) यांचा पराभव केला आणि नितीनने जीएम बोरिस सावचेन्को (रशिया, २४८१) याच्यावर विजय मिळवला. ज्यामुळे दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी ४ गुणांसह आघाडी मिळाली. जीएम एस.पी. सेथुरामन (तामिळनाडू, २५६०) याने जीएम मरत झुमाएव (उझबेकिस्तान, २३६४) याचा पराभव करून आपली विजयी मालिका सुरू ठेवली, तर आयएम स्लिझेव्स्की अलेक्झांडर (रशिया, २३४०) याने आयएम आयुष शर्मा (मध्य प्रदेश, २४६९) विरुद्ध महत्त्वपूर्ण विजय मिळवला. जीएम सिद्धार्थ जगदीश (सिंगापूर, २५१६) आयएम शाहिल डे (आसाम, २३७४) याचा पराभव करून ३.५ गुणांसह स्पर्धेत कायम आहे. दरम्यान, ग्रँडमास्टर गुयेन डुक होआ (व्हिएतनाम, २३५९) आणि ग्रँडमास्टर दिप्तयन घोष (आरएसपीबी, २५६९) यांच्यातील अव्वल बोर्ड सामना बरोबरीत सुटला. दोन्ही खेळाडूंचे ३.५ गुण झाले आहेत.
गाेव्याच्या खेळाडूंची प्रशंसनीय कामगिरी
गोव्याचे खेळाडू प्रशंसनीय कामगिरी करत आहेत, ज्यामध्ये आयएम एथन वाझ आघाडीवर आहेत. एथनने चौथ्या फेरीत ग्रँडमास्टर लक्ष्मण आर.आर. (आयसीएफ, २३०३) याला हरवून विजय मिळवला आणि आता ३.५ गुणांसह तो संयुक्त दुसऱ्या स्थानावर असलेल्या खेळाडूंपैकी एक बनला आहे. ग्रँडमास्टर अनुराग म्हमाल (२४९९) याने विंडमास्टर मृदुल देहनकर (एमएएच, २१२१) यांच्याविरुद्ध महत्त्वपूर्ण विजय मिळवत ३ गुण मिळवले. आयएम अमेया आैदी (२४२२) ने ग्रँडमास्टर रासेट झियातदिनोव्ह (यूएसए, २०३१) ला हरवून २.५ गुण पटकावले. आयएम रित्विज परब (२३७१), ग्रँडमास्टर मित्रभा गुहा (डब्ल्यूबी, २५०९) कडून पराभूत झाला आणि सध्या त्याचे २.५ गुण आहेत.