पहिल्या सामन्यात यजमान भारताचा नेपाळवर ४२-३७ ने विजय
नवी दिल्ली : भारताच्या राजधानीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये खो-खो विश्वचषकाला शानदार रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाने सुरुवात झाली व उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते विश्वचषक स्पर्धेचे उद्घाटन झाले. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने नेपाळचा ४२-३७ ने पराभव करून विश्वचषकात विजयी सुरुवात केली.
याप्रसंगी केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया व क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे, ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पी.टी उषा, खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल, सरचिटणीस महेंद्रसिंग त्यागी, सह सचिव प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव व महासंघाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
या स्पर्धेत २३ देशांतील ३९ संघांनी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेतील २० पुरुष आणि १९ महिला संघांनी उद्घाटन प्रसंगी संचालनात भाग घेतला व संपूर्ण मैदानाला फेरी मारून उत्साह वाढवणाऱ्या प्रेक्षकांचे आभार मानले. या संचालनात भारतीय महिला खेळाडूंनी साडी परिधान करून आपल्या देशाची परंपरा व संस्कृती जपत एक वेगळा संदेश दिला. यावेळी भारताचे कर्णधार प्रतिक वाईकर व प्रियांका इंगळे यांनी शपथ घेतली त्यावेळी इतर देशांचे कर्णधार त्यांच्या मागे उभे राहून शपथ घेतली.
आज होणारे सामने : पुरुष (सकाळी १०.३० पासून) : साऊथ आफ्रिका-घाना, बांगलादेश- श्रीलंका, इंग्लंड-जर्मनी, घाना-नेदरलँडस , पेरू- भूतान,अर्जेंटिना-इराण, दक्षिण कोरिया- पोलंड, मलेशिया- केनिया, दक्षिण आफ्रिका नेदरलँडस, बांगलादेश-अमेरिका, इंग्लंड ऑस्ट्रेलिया, नेपाळ- पेरू, घाना-अर्जेंटिना, भारत-ब्राझील (रात्री ८.१५).
महिला (सकाळी ११.४५ पासून) : इंग्लंड- ऑस्ट्रेलिया, नेपाळ- भूतान, दक्षिण आफ्रिका न्यूझीलंड, श्रीलंका-बांगलादेश, केनिया- नेदरलँडस, इंग्लंड-युगांडा, भारत-दक्षिण कोरिया (रात्री ७ वा. ), दक्षिण आफ्रिका-पेरू, नेपाळ-जर्मनी, इराण-मलेशिया (रात्री ७.४५).