२३ जानेवारीपासून स्पर्धेला सुरुवात : आतापर्यंत २५० पेक्षा जास्त प्रवेशिका प्राप्त
पणजी : देशातील सर्वात प्रतिष्ठित टेनिस स्पर्धांपैकी एक, ‘गद्रे गास्पर डायस ओपन २०२५’ च्या दहाव्या आवृत्तीसाठी नोंदणीला सुरुवात झाली आहे.
या वर्षीच्या आवृत्तीत विविध श्रेणींमध्ये आतापर्यंत २५० पेक्षा अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. गोवा आणि राज्याबाहेरील अनुभवी खेळाडू तसेच नवोदित प्रतिभेमध्ये या स्पर्धेची वाढती लोकप्रियता अधोरेखित होत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
पणजीतील क्लब टेनिस दे गास्पर डायसतर्फे गोवा राज्य टेनिस असोसिएशन (जीएसटीए) आणि गद्रे गटाच्या पाठिंब्याने ही स्पर्धा आयोजित केली आहे. भारतभरातील अव्वल टेनिसपटूंना एकत्र आणणारी ही स्पर्धा २३ जानेवारीपासून सुरू होत आहे. गोव्यातील या अनोख्या स्पर्धेत मास्टर्स आणि ओपन श्रेणीतील थरारक सामने पाहायला मिळतील, जिथे गोवा आणि देशभरातील अनुभवी खेळाडू आपली कौशल्ये सादर करतील. स्पर्धेची नोंदणी १५ जानेवारीला संपेल.
मास्टर्स श्रेणीत ४५+, ५५+, आणि ६०+ वयोगटांसाठी एकेरी सामने आयोजित करण्यात आले आहेत. याशिवाय, ९०+ मास्टर्स दुहेरी (किमान वय ३५), ११०+ मास्टर्स दुहेरी (किमान वय ४०), आणि १२०+ अनुभवी दुहेरी (किमान वय ४०) अशा विविध वयोगटांसाठी दुहेरी सामनेही होणार आहेत. या श्रेणीत ३५+ मिश्र दुहेरी ही एकमेव मिश्र गटातील स्पर्धा आहे. मात्र, मास्टर्स श्रेणी केवळ पुरुष खेळाडूंकरिता खुली आहे.
खुल्या गटात सहा उपगट आहेत, ज्यात १२ वर्षांखालील (मुली आणि मुलांसाठी), १६ वर्षांखालील (मुली आणि मुलांसाठी), पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरी यांचा समावेश आहे. इच्छुक सहभागी ऑनलाइन नोंदणीसाठी https://app.gadregasparopen.com/ वर भेट देऊ शकतात. अतिरिक्त सहाय्यासाठी, कृपया संतोष, ९९२३६६६९२० किंवा दीपक ८०७६०४८४०८ यांच्याशी संपर्क साधा.
२ फेब्रुवारीला अंतिम सामना
स्पर्धेची सुरुवात मास्टर्स श्रेणीच्या सामन्यांनी होणार असून, ते २३ ते २६ जानेवारीदरम्यान पार पडतील. त्यानंतर, २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान तीव्र चुरशीचे खुल्या गटातील सामने रंगतील.