भारतीय महिलांकडून आयर्लंडचा सहा गड्यांनी पराभव
राजकोट : भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि आयर्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी १० जानेवारी रोजी खेळवण्यात आला. दोन्ही संघांमधील हा सामना राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवण्यात आला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात प्रतिका रावल आणि तेजल हसबनीसच्या स्फोटक खेळीच्या जोरावर टीम इंडियाने आयर्लंडचा सहा गड्यांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ही एकदिवसीय मालिका आयसीसी चॅम्पियनशिप सामन्याअंतर्गत खेळवली जात आहे.
या मालिकेत टीम इंडियाची कमान स्मृती मानधनाच्या खांद्यावर आहे. तर, आयर्लंडचे नेतृत्व गॅबी लुईसकडे आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडच्या गॅबी लुईसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना त्यांची सुरुवात निराशाजनक झाली. त्यांचे चार फलंदाज फक्त ५६ धावांवर बाद झाले.
आयर्लंड संघाने निर्धारित ५० षटकांत सात गडी गमावून २३८ धावा केल्या. सयाली सातघरे आणि प्रिया मिश्रा यांनी भारताच्या गोलंदाजीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. दोघांनीही मध्यभागी किफायतशीर गोलंदाजी केली आणि बळीही घेतले.
भारतीय गोलंदाजांमध्ये, सायली सातघरेने १० षटकांत ४३ धावा देत १ बळी घेतला आणि ४.३ च्या इकॉनॉमीने धावा दिल्या. याशिवाय प्रिया मिश्राने ९ षटकांत ५६ धावा देत २ बळी घेतले, तर दीप्ती शर्माने १० षटकांत ४१ धावा देत १ बळी घेतला.
लक्ष्याचा पाठलाग करताना, टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी आक्रमक फलंदाजी केली आणि पहिल्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. टीम इंडियाने ३४.३ षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले. टीम इंडियाकडून सलामीवीर प्रतिका रावलने ८९ धावांची शानदार खेळी केली.
या उत्कृष्ट खेळीदरम्यान, प्रतीका रावलने ९६ चेंडूत १० चौकार आणि एक षटकार मारला. प्रतिका रावल व्यतिरिक्त, तेजल हसबनीसने नाबाद ५३ धावा केल्या. दुसरीकडे, फ्रेया सार्जंटने आयर्लंड संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. आयर्लंडकडून एमी मॅग्वायरने सर्वाधिक तीन बळी घेतले. एमी मॅग्वायर व्यतिरिक्त, फ्रेया सार्जंटने १ बळी घेतला. टीम इंडिया आणि आयर्लंड यांच्यातील मालिकेतील दुसरा सामना रविवार, १२ जानेवारी रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ११ वाजता राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल.
प्रतिका रावलचे शतक हुकले
स्मृती मानधनाने २९ चेंडूत ४१ धावांची जलद खेळी केली. यादरम्यान तिने ६ चौकार आणि एक षटकार मारला. दुसरीकडे, प्रतीका रावलने सुरुवात हळू केली पण त्यानंतर तिनेही वेगाने धावा काढायला सुरुवात केली. प्रतिकाने तिच्या खेळीदरम्यान ९६ चेंडूत ८९ धावा केल्या. पण, तिचे शतक हुकले.
स्मृतीचा विक्रम
मालिकेतील पहिल्याच सामन्यात स्मृती मानधनाने मोठा विक्रम आपल्या नावे केला. तिची खेळी लहान होती पण नेहमीप्रमाणे ती प्रभावी होती. नवीन सलामीवीर प्रतीका रावल संथ फलंदाजी करत असताना, स्मृती मानधनाने वेगवान खेळी करत तिच्या संघाला जलद सुरुवात करून दिली. या काळात, तिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक नवीन टप्पा गाठला आहे, जो आतापर्यंत भारतासाठी फक्त दोन महिला फलंदाजांना साध्य करता आला आहे. स्मृतीने एक दिवसीय क्रिकेटमध्ये ४००० धावा पूर्ण केल्या
स्मृतीच्या ४००० धावा पूर्ण
स्मृती मानधना आता भारतासाठी एकदिवसीय सामन्यात चार हजारांहून अधिक धावा करणारी फलंदाज बनली आहे. तिच्या पुढे फक्त मिताली राज आहे, जिने सात हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. मिताली राजने २३२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ७८०५ धावा केल्या आहेत. स्मृती मानधनाने आतापर्यंत ९५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४००१ धावा केल्या आहेत.
स्मृती हरमनप्रीत कौरपेक्षा खूप पुढे
स्मृतीच्या आधी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी हरमनप्रीत कौरही स्मृती मानधनापेक्षा खूपच मागे आहे.जर आपण हरमनप्रीत कौरबद्दल बोललो तर तिने १४१ एकदिवसीय सामने खेळून ३८०३ धावा केल्या आहेत. म्हणजे स्मृती तिच्यापेक्षा खूप पुढे आहे. एक युक्तिवाद असा करता येईल की स्मृती मानधना सलामीवीर म्हणून येते, तर हरमनप्रीत कौर खालच्या क्रमात फलंदाजी करते. तर दोघांची सरासरी पाहता स्मृती मानधनाची एकदिवसीय सामन्यात सरासरी ४४.९५ आणि हरमनप्रीत कौरची सरासरी ३७.२८ आहे. म्हणजे इथेही हरमनप्रीत कौर स्मृती मानधनाच्या मागे आहे.