ऑस्ट्रेलियात २०२२ मध्ये जेवणातून झाला विषप्रयोग

स्टार टेनिसपटू नोव्हाक ज्योकोविचच्या दाव्याने क्रीडा वर्तुळात खळबळ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th January, 11:56 pm
ऑस्ट्रेलियात २०२२ मध्ये जेवणातून झाला विषप्रयोग

नवी दिल्ली: सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा स्टार टेनिसपटू नोव्हाक ज्योकोविचने दावा केला आहे की, २०२२ मध्ये मेलबर्नमध्ये असताना त्याच्या जेवणात विष मिसळून देण्यात आले होते. ऑस्ट्रेलियन ओपन २०२२ दरम्यान मेलबर्नमध्ये त्यांच्यासोबत ही घटना घडली होती. त्यावेळी त्याने कोविड-१९ लसीकरण करून घेण्यास नकार दिला होता, ज्यामुळे नोव्हाकला देश सोडण्यासही सांगितले गेले होते.
ज्योकोविच याने गुरुवारी एका मुलाखतीत सांगितले की, त्या वेळी मला काही आरोग्यविषयक समस्या होत्या आणि मला जाणवले की मेलबर्नमधील त्या हॉटेलमध्ये मला काहीतरी विषारी पदार्थ खायला दिले गेले होते. जेव्हा मी सर्बियामध्ये परतलो, तेव्हा मला समजले की माझ्या शरीरात पारा आणि शिसे खूप जास्त प्रमाणात होते. मी ही गोष्ट कधीच कोणाला सांगितली नव्हती, पण आता याची मला खात्री झाली आहे, की त्यावेळी माझ्यावर विषप्रयोग झाला होता.
नोव्हाकच्या या दाव्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, गोपनीयतेच्या कारणास्तव मी या प्रकरणांवर भाष्य करू शकत नाही. दरम्यान सरकारचे म्हणणे आहे की, ज्या पार्क हॉटेलमध्ये नोव्हाकला ठेवण्यात आले होते, तिथे प्रत्येकाला ताजे शिजवलेले लंच आणि डिनर दिले जात होते.
कोविड-१९ मुळे नोव्हाकला ठेवले होते हॉटेलमध्ये
नोव्हाकला हॉटेलमध्ये ताब्यात ठेवण्यात आले होते, कारण ऑस्ट्रेलियात थांबण्यासाठी त्याची कायदेशीर लढाई सुरू होती. नोव्हाकने कोविड-१९ चाचणी करण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याला हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. नोव्हाकला हॉटेलमध्ये ब्रेड, नूडल्स, चहा आणि कॉफी यासारख्या नाश्त्याचे पदार्थ दिले जात होते. मात्र, त्यामध्ये विष होते की नाही हे तिथले अधिकारीच सांगू शकतील, असे गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले.