डॉन बॉस्को महाविद्यालय फातोर्डाला टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद

गोवा विद्यापीठातर्फे स्पर्धेचे आयोजन : व्हीव्हीएमच्या श्री दामोदर महाविद्यालयाला उपविजेतेपद

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th January, 10:37 pm

पणजी : डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फातोर्डाने गोवा विद्यापीठ आयोजित पुरुषांसाठीच्या आंतर महाविद्यालयीन टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत विजेतेपद पटकावले. स्पर्धा एसएजीच्या फातोर्डा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स फातोर्डा येथील टेनिस कोर्टवर आयोजित करण्यात आली होती.

किताबी लढतीत डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फातोर्डाने व्हीव्हीएमच्या श्री दामोदर महाविद्यालय ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, मडगावच्या संघाचा २-१ असा पराभव केला.

अंतिम फेरीत पहिल्या एकेरीत डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या राउल वाझने श्री दामोदर कॉलेजच्या संप्रभ फळदेसाईचा ६-२ असा पराभव केला. दुसऱ्या एकेरीत श्री दामोदर कॉलेजच्या सनथ नेवगीने डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या डीऑन ब्रागांझाचा २-६ असा पराभव केला.

निर्णायक दुहेरीत राऊल वाझ आणि प्रणिल नाईक यांनी प्रतिनिधित्व केलेल्या डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फातोर्डाने श्री दामोदर कॉलेजच्या संप्रभ फळदेसाई आणि जबीउल्ला बंकापूर यांचा ४-६ असा पराभव करून गोवा विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन पुरुष टेनिस अजिंक्यपद २०२४-२५ जिंकले.

तत्पूर्वी, उपांत्य फेरीत श्री दामोदर कॉलेजने सेंट जोसेफ कॉलेज वाझ कॉलेज कुठ्ठाळीचा २-० असा पराभव केला आणि डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फातोर्डाने डॉन बॉस्को कॉलेज पणजीचा २-१ असा पराभव केला. दोन दिवसांच्या या टेनिस चॅम्पियनशिपमध्ये एकूण १९ संघांनी भाग घेतला होता. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फातोर्डाच्या राऊल वाझ याला देण्यात आला.

या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे व्हीव्हीएमच्या श्री दामोदर कॉलेज मडगावचे कार्यकारी प्राचार्य प्रा. संजय देसाई आणि सन्माननीय अतिथी टेनिस प्रशिक्षक सुरेश कदम यांच्यासह गोवा विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागाचे सहाय्यक संचालक बालचंद्र जादर यांनी विजेत्यांना पदके आणि ट्रॉफी प्रदान केल्या.

विजेत्या व उपविजेत्या संघातील खेळाडू

डॉन बॉस्को संघ : राउल वाझ, डीऑन ब्रागांझा, रोनाल्ड फर्नांडिस, प्रणील नाईकण तबरेज अगस्नाली. या संघासोबत संघासोबत महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण आणि क्रीडा संचालक क्लिफर्ड ब्रिटो उपस्थित होते..

श्री दामोदर महाविद्यालयाचा संघ : संप्रभ फळदेसाई, सौरव नाईक, जबीउल्ला बंकापूर, सनथ नेवगी, रिजुल पाठक. संघासोबत महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण आणि क्रीडा संचालक डॉ. अजिंक्य कुडतडकर आणि शारीरिक शिक्षण प्रशिक्षक सौरव रायकर यांचा समावेश होता.