मडगाव : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी काणकोण पोलिसांकडून उद्योजक दत्ता नायक यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दत्ता नायक यांनी मडगाव न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सोमवारी जामीन अर्जावर सुनावणी झाली व अटीशर्तीवर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला.
धर्माच्या नावाखाली मठ, मंदिरे भरपूर पैसे लुटतात असे वक्तव्य उद्योजक दत्ता नायक यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केले होते. यानंतर सामाजिक शांततेचा भंग करत धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दत्ता दामोदर नायक यांच्याविरोधात काणकोण पोलीस स्थानकात तक्रार नोंद झाली होती. त्यानंतर पणजी व मडगाव पोलीस स्थानकातही नायक यांच्याविरोधात याचप्रकरणी तक्रारी दाखल झालेल्या होत्या.
काणकोण पोलिसांनी तक्रारीनुसार धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दत्ता नायक यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद झाल्यानंतर नायक यांच्याकडून मडगाव येथील न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. या अर्जावर सुनावणीवेळी काणकोण पोलिसांनी जामीनाला विरोध दर्शवला तर न्यायालयाकडून अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला सोमवारी जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी न्यायालयाकडून २५ हजाराच्या वैयक्तिक जातमुचलक्याच्या अटीवर नायक यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.