आपल्या आधीच्या पिढीच्या बायकांना कुठेही जायला सोबत लागायची ती यामुळेच का? म्हणजे त्यांच्यात आत्मविश्वास कमी होता असे म्हणण्यापेक्षा तो निर्माण झाला नाही किंवा होऊ शकला नाही असे तर नसेल ना?
झिम्मा चित्रपटात एक दृश्य आहे. बायकांचा ग्रुप घेऊन इंग्लंडला टूरसाठी गेलेला सिद्धार्थ चांदेकर सगळ्यांना लंडनमध्ये फिरवत असतो. वेगवेगळ्या विचारसरणीच्या आणि राहणीमानाच्या या बायका एकत्र फिरत असतात. अशातच क्षिती जोग, जिचा आत्मविश्वास जरा कमी असतो, वॉशरूम कुठे आहे असा प्रश्न सायली संजीव या मॉडर्न, स्वतंत्र विचारांच्या, बिनधास्त मुलीला विचारते. यावर सायली एका दिशेने बोट दाखवते. क्षिती तिला विचारते की तू येतेस का? ती म्हणते की नाही, मला काही जायचे नाही आणि तिथून निघून जाते. खरेतर क्षितीला असे अपेक्षित असते की सायलीने तिच्याबरोबर यावे पण सायलीच्या हे गावीही नसते की वॉशरूमला जायलाही सोबत लागू शकते!
हे फक्त उदाहरण. खरेतर चित्रपटात क्षिती जोग निभावत असलेल्या भूमिकेची पार्श्वभूमी वेगळी आहे. नवऱ्याच्या अकाली मृत्यूमुळे ती बिथरली आहे असे दाखवले आहे. पण माहीत नाही का, हे दृश्य माझ्या मनात इतकी वर्ष राहिले आणि कितीतरी वेळा त्याला साधर्म्य असणाऱ्या घटना माझ्या आजूबाजूला दिसू लागल्या, काही भूतकाळातल्या आठवू लागल्या.
हल्लीच माझ्या एका मैत्रिणीने सांगितले की ती एकटी कुठेही फिरत असली की तिला हटकून, “नवरा कुठे आहे तुझा? आज एकटीच?” असा प्रश्न विचारला जातो. नवरा कामात व्यग्र असल्यामुळे बायको लेकीला घेऊन फिरायला जाते ही खरेतर चांगली, कौतुकाची गोष्ट. पण विचारणाऱ्याच्या पद्धतीवरून मैत्रिणीला वाईट वाटले. माझ्या लहानपणी माझे वडीलही कामानिमित्त बाहेरगावी असायचे. तेव्हा माझ्या आईलाही या प्रश्नांचा अनेक वेळा सामना करावा लागला आहे. काहीवेळा काळजीचा आव आणून प्रश्न विचारले जायचे तर काहीवेळा गॉसिप करण्याच्या हेतूने. त्यावेळी मला ते समजायचे नाही पण आता लक्षात येते.
आपल्या आधीच्या पिढीच्या बायकांना कुठेही जायला सोबत लागायची ती यामुळेच का? म्हणजे त्यांच्यात आत्मविश्वास कमी होता असे म्हणण्यापेक्षा तो निर्माण झाला नाही किंवा होऊ शकला नाही असे तर नसेल ना?
कुटुंबातले सदस्य, समाज दरवेळी थेट बंधनं घालूनच अत्याचार करतो असे नाही. किंवा घरगुती हिंसाचार म्हणजे केवळ मारणे, धमकावणे असते असेही नाही. बाईचे स्वातंत्र्य कोणत्याही प्रकारे हिरावून घेणे हाही मानसिक हिंसाचार आहेच. आपली बायको आपल्यावर अवलंबून असते हा विचार कदाचित काही पुरुषांसाठी सुखावणारा असू शकेल पण आपण शक्य तितक्या स्वतंत्र झालो आहोत/होत आहोत हा विचार प्रत्येक बाईला मग तिचे वय काहीही असो, सुखावणारा ठरला तर? ‘एक कदम’ नावाचा एक लघुपट आहे. एरवी बाहेरची सगळी कामे करणारा नवरा काही कारणाने बाहेर जाऊ शकत नाही. म्हणून बाहेरची कामे करायला ती पहिल्यांदाच बाहेर पडते. सुरुवातीला घाबरून, गांगरून गेलेली ती हळूहळू स्वतः शिकत, चुकत आत्मविश्वास कमावते आणि मग त्यातून मिळणारे समाधान अनुभवते. केलेल्या चुकांसाठी बोलणीही खाते. पण आता तिच्याकडे एक गोष्ट असते, ती म्हणजे स्वतःची सोबत! ही गोष्ट तिच्याकडून कुणीच हिरावून घेऊ शकत नसते. आपली स्वत:ची सोबत एकदा अनुभवता आली की मग आपल्यात एक वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास येतो याची जाणीव तिला होते. अशाने सगळी कामे सोपी होतात का? तर नाही. फक्त मग समोर असलेल्या अडचणी दूर होतील असे सांगणारा आवाज सोबत असतो आणि तो दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा नसून आपल्या स्वत:चा असतो.
सुरुवातीला फक्त कामासाठी बाहेर पडणारी ती मग नंतर तिची इच्छा म्हणून, हौस म्हणून बाहेर जाते. तिला आधार म्हणूनही कुणी बरोबर नको असते आणि सोबत म्हणूनही नाही!
दिशा दाखवणारे, रस्ता सांगणारे बरेच जण असतात. अडवून ठेवणारे, चुकशील, भरकटशील असे सांगणारेही बरेच जण असतात... पण पाऊल पुढे आपल्याच टाकायचे असते. हे पाऊल प्रत्येकीसाठी वेगळे असते. कुणासाठी घरातून बाहेर पडणे असेल, कुणासाठी बँकेचा व्यवहार असेल, कुणासाठी शिक्षण असेल, कुणासाठी गाडी चालवणे असेल तर कुणासाठी आर्थिक स्वातंत्र्य असेल. ध्येयाच्या दिशेचे हे पहिले पाऊलच महत्त्वाचे असते, अवघड असते... पण ते टाकले की पुढचा रस्ता आपोआप दिसू लागतो असा सरळ सरळ संदेश देणारा हा लघुपट अनेक कारणांसाठी आवडला...
मुग्धा मणेरीकर, फोंडा