हिवाळा ऋतू आला आहे. गोव्यात अगदीच थंड नसलं तरी सकाळ संध्याकाळ मात्र हवीहवीशी गोड गुलाबी थंडी लागतेय. थंडी सुरू होताच आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढू लागते. हिवाळ्यात सर्दी खोकला सामान्यपणे वारंवार असतोच पण त्यासोबत अनेकांच्या आरोग्याच्या समस्याही सुरू होतात.
संधिवात, ल्युपस किंवा फायब्रोमायल्जिया यासारख्या परिस्थितीशी संबंधित सांधेदुखीने ग्रस्त असलेले लोक अनेकदा तापमान कमी झाल्यावर सांधेदुखी वाढणे, स्नायूंमध्ये कडकपणा येणे या तक्रारी करतात व फक्त वृद्धांनाच नाही तर सामान्य लोकांनाही हे त्रास जाणवू शकतात. यामुळे या ऋतूत सगळ्यांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक असते.
हिवाळ्यात सांधेदुखी कशामुळे वाढते याचे नेमके शास्त्रशुद्ध कारण अस्पष्ट असले तरी खूप आधीपासून थंडीचा सांध्यांवर परिणाम होत असल्याचे मानले जाते. वाढत्या थंडीमुळे रक्ताभिसरण कमी होते. तसेच या ऋतूत कमी शारीरिक हालचालींमुळे हाडांमधील हालचालही कमी होते. तापमान आणि थंड हवामानातील बदलांमुळे स्नायू आणि सांध्याच्या आवरणामध्ये जडपणा येऊ शकतो. हे सांधेदुखीची समस्या वाढण्याचे कारण असू शकते. याशिवाय, ‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेमुळे शरीर कडक होऊन सांधे दुखू शकतात. या ऋतूमध्ये जुने दुखणे डोके वर काढते. अनेकांना जुन्या जखमांमध्ये तसेच पूर्वीच्या ऑपरेशनच्या ठिकाणी वेदना जाणवू लागतात. थंडीच्या ऋतूमध्ये सतावत असलेल्या या तक्रारींना आटोक्यात ठेवण्यासाठी पुढील काही गोष्टींचा अवलंब केल्याने त्रास कमी होऊ शकतो.
रोज सूर्यप्रकाश घ्या : रोजचा सकाळचा दिनक्रम धावपळीचा असल्याने लोकांना सकाळच्या उन्हासाठी वेळ देता येत नाही. तसेच घरून काम करताना किंवा बंद इमारतीत एअर कंडिशनमध्ये काम करत असलेल्या ठिकाणी सूर्यप्रकाशाचा अभाव असतो. यामुळे सूर्यकिरणांतून मोठ्या प्रमाणात मिळू शकणारे ‘जीवनसत्व ड’ मिळत नाही. याच्या कमतरतेमुळे स्नायू किंवा हाडांमध्ये लवचिकता कमी होते, खूप थकवा येतो, स्नायूंची हालचाल मंदावते. याकारणामुळे जेव्हा शक्य असेल तेव्हा दिवसा उन्हात राहावे व एका जागी असल्यास अर्ध्या तासाने किंवा ४० मिनिटांनी दोन ते तीन मिनिट चालावे.
शरीर हायड्रेटेड ठेवा : हिवाळ्यात थंडीमुळे वारंवार बाथरूममध्ये जावे लागत असल्याने पाणी पिणे कमी होते. ज्यामुळे शरीरात अनेकदा डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. थंडीत स्वत:ला हायड्रेट ठेवणे महत्त्वाचे आहे. जेव्हा शरीर हायड्रेटेड असते तेव्हा सांधेदुखी, स्नायूतील वेदना व क्रॅम्सदेखील कमी होतात कारण भरपूर द्रवपदार्थ प्यायल्याने सांधे आणि स्नायूंचे कार्य योग्य प्रकारे होते.
दिनक्रमात व्यायाम असू द्या : स्नायूंना आराम देण्यासाठी तसेच सांधेदुखी टाळण्यासाठी व्यायाम जीवनशैलीचा भाग बनवा. नियमित व्यायामामध्ये स्ट्रेचिंग, सायकलिंग, चालणे, एरोबिक्स व्यायाम असू द्या. जास्त वेदना होत असल्यास जास्त श्रमाचे व्यायाम न करता, स्नायूंना बळ देणारे सूक्ष्म योग व ताकद वाढवणारे व्यायाम आपण करू शकतो.
चुकीच्या हालचाली सुधारा : आपण ज्याप्रकारे उठतो-बसतो, आपल्या हालचाली करतो त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतच असतो. त्यात अनेकजण कामाच्या ठिकाणी बराच वेळ चुकीच्या पद्धतीने बसतात, ज्यामुळे स्नायूंमध्ये कडकपणा आणि वेदना होण्याची शक्यता असते. आधीच पाठदुखी असल्यास जड वस्तू उचलणे टाळावे. कारण थंडीच्या दिवसात हे त्रास जास्त होतात.
आहार सांभाळावा : सांधेदुखीचा त्रास होत असताना आपला आहार सांभाळणे गरजेचे असते. यासाठी आहारामधे नेहमी सी, डी आणि के जीवनसत्त्वे असलेले अन्न ठेवावे. हिवाळ्यात पालक, कोबी, टोमॅटो आणि संत्री यांसारख्या गोष्टींचा आहारात समावेश ठेवावा. कॅल्शियम व इतर खनिजयुक्त आहार ठेवावा जे हाडे आणि सांध्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.
हिटींग पॅडचा वापर करावा : थंडीच्या दिवसात संधिवात आणि सांधेदुखीचा त्रास होत असल्यास दुखत असलेल्या भागावर हिटींग पॅडच्या सहाय्याने किंवा कपड्याने गरम शेक द्यावा. तसेच झोपण्यापूर्वी पाय कोमट पाण्यात ठेवावे. त्याने आराम मिळतो.
शरीर उबदार ठेवावे : हिवाळ्यात उबदार राहिल्याने आपल्याला आराम मिळतोच पण सांधेदुखीपासूनही आराम मिळतो. अति थंडीमुळे रक्तदाबावरही परिणाम होत असतो. पण उबदार राहिल्यास शरीरात रक्ताभिसरण सामान्य राहते व शरीराच्या सर्व अवयवांमध्ये पुरेसे पोषण आणि ऑक्सिजन पोहोचतो. ज्यामुळे शरीरात जडपणा आणि वेदना जाणवत नाहीत.
डॉ. श्वेता राऊत मुळगावकर