आयपीएस अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांशी गैरवर्तणूक भोवली
म्हापसा : हडफडे येथे एका आयपीएस अधिकाऱ्याच्या नातेवाईकांशी चलनाच्या नावाखाली गैरवर्तणूक करण्याचा प्रकार हणजूण वाहतूक पोलिसांच्या अंगलट आला. या चारही पोलिसांची तडकाफडकी गोवा राखीव दलात (जीआरपी) बदली करण्यात आली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा यांच्या सूचनेनुसार, वाहतूक पोलीस अधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी हा बदलीचा बिनतारी आदेश जारी केला आहे.
सहाय्यक उपनिरीक्षक राजन म्हामल, हवालदार विश्राम मळीक, हवालदार संजय गावडे व हवालदार रूपेश राऊत यांचा बदली झालेल्या पोलिसांत समावेश आहे. यातील एक हवालदार हा त्या दिवशी घटनास्थळी वाहतूक पॉईंटवर सेवेवर नेमणुकीशिवाय हजर होता.
शनिवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ही घटना हडफडे येथे घडली होती. एका आयपीएस अधिकाऱ्यांचे नातेवाईक गोव्यात पर्यटनासाठी आले होते. हे पर्यटक दुचाकीवरून कळंगुट व हणजूण भागात फेरफटका मारत होते. त्यावेळी हडफडे येथे वाहतूक सेवेत कार्यरत असलेल्या वरील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवून चलन देण्याच्या नावाखाली त्यांच्याशी गैरवर्तणूक केली. तसेच त्यांना तासभर भर रस्त्यावर अडवून ठेवले होते.
आपण एका आयपीएस अधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याचे सांगूनही वाहन वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल भरमसाठ दंडाची रक्कम भरण्यास सांगितली. त्यानंतर हे पोलीस वाटाघाटीवर आले होते.
हा प्रकार संबंधित पर्यटकांनी आपल्या नातेवाईक आयपीएस अधिकाऱ्यांच्या कानी घातल्यानंतर संबंधित पोलिसांची सोमवार, दि. २ डिसेंबर रोजी वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी केली. या चौकशीनुसार, चारही पोलिसांची जीआरपीमध्ये बदली करण्यात आली व तत्काळ राखीव दलात रूजू होण्याचा आदेश संबंधितांना देण्यात आला.
८ महिन्यात १८ पोलिसांवर कारवाई
गेल्या आठ महिन्यांत हणजूण वाहतूक पोलीस सेलच्या एकूण १८ कर्मचाऱ्यांवर तडकाफडकी बदलीची कारवाई झाली आहे. पर्यटकांशी गैरवर्तणूक आणि लुबाडणुकीसह कथित भ्रष्टाचाराचा ठपका या पोलिसांवर ठेवण्यात आला आहे. गेल्या मार्चमध्ये ११ पोलिसांची बदली झाली होती. त्यातील तिघांवर निलंबनाची कारवाई झाली. तर, २९ नोव्हेंबर रोजी ३ तर आता ३ डिसेंबर रोजी ४ पोलिसांची बदली झाली. यामुळे वाहतूक पोलीस सेल संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.