१३० कोटींच्या गुंतवणूक घोटाळा प्रकरणात होणार चौकशी
पणजी : १३० कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्यातील संशयित मायरन राॅड्रिग्ज याची पत्नी सुनीता राॅड्रिग्ज हिला चौकशीसाठी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागातर्फे (ईओसी) बुधवारी उपस्थित राहण्यासाठी दुसऱ्यांदा नोटीस बजावण्यात येणार आहे.
मायरन राॅड्रिग्ज याने जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक केली. या प्रकरणी ईओसीने त्याच्यासह इतरांवर २०२३ मध्ये दोन गुन्हे दाखल केले आहेत. त्यात ईओसीने प्रथम राॅड्रिग्ज आणि त्याची पत्नी दीपाली परब हिला संशयित केले होते. त्यानुसार, त्या दोघांनी गोव्यातील ३८ जणांची २५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी ईओसीने गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. राॅड्रिग्ज याने २००९ ते १७ ऑगस्ट २०२३ या काळात १३० कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार केल्याचे समोर आले. राॅड्रिग्ज याने आयडीलीक गोवन गेटवेज कंपनीत ३.२५ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे समोर आल्यानंतर ईओसीने कंपनीचे संचालक नॉलन आंताव, ज्योकिम रोझारियो पिरीस, विजय जाॅयल, नवनिक परेरा आणि सुशांत घोडगे यांना संशयित करून चौकशी केली. दरम्यान, मुख्य संशयित मायरन गुन्हा दाखल होण्यापूर्वी लंडनमध्ये पळून गेल्यामुळे त्याच्या विरोधात इंटरपोलद्वारे ‘रेड काॅर्नर’ नोटीस जारी केली आहे. याच दरम्यान, मुंबई पोलिसांनी मायरन, सुनीता राॅड्रिग्ज आणि दीपाली परब यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
दरम्यान, ईओसीने सुनीता राॅड्रिग्ज हिला ३० नोव्हेंबर रोजी उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावली होती. त्यावेळी ती हजर राहू शकत नसल्यामुळे तिने दुसरी तारीख निश्चित करण्याची विनंती ईओसीला केली होती. तसेच शुक्रवार ६ रोजी चौकशीला हजर राहण्यास तयार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार, बुधवारी ईओसी सुनीता राॅड्रिग्ज हिला चौकशीसाठी पाचारण करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ईओसीकडून यांना ‘लूक आऊट’ जारी
दीपाली परबचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर ती फरार झाली आहे. तिच्या विरोधात ईओसीने ‘लूक आऊट’ जारी केले आहे. ईओसीने सुनीता राॅड्रिग्जसह आयडीलीक कंपनीचे संचालक नॉलन आंताव, ज्योकिम पिरीस, विजय जाॅयल, नवनिक परेरा आणि सुशांत घोडगे यांच्या विरोधातही ‘लूक आऊट’ जारी केले आहे.