पणजी : जमीन हडप प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ अंतर्गत मुख्य सूत्रधार विक्रांत शेट्टी आणि राजकुमार मैथी या दोघांना अटक केली होती. या प्रकरणी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने विक्रांत शेट्टी याला पाच लाख रुपये व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला आहे. याबाबतचा आदेश न्या. भारत देशपांडे यांनी दिला आहे.
राज्यात बनावट कागदपत्रे तयार करून जमिनी हडप केल्याच्या अनेक तक्रारी विविध पोलीस स्थानकांमध्ये दाखल झाल्या होत्या. याची दखल घेऊन सरकारने विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केल्यानंतर पथकाने आतापर्यंत ५० हून जास्त गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, ईडीने वरील प्रकरणाची दखल घेऊन म्हापसा पोलीस स्थानकात दाखल केलेल्या तीन गुन्ह्यांचा तपास सुरू केला असता, त्यात सहभागी असलेल्यांची ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ अंतर्गत प्राथमिक चौकशी सुरू केली. त्यानंतर ईडीने मुख्य सूत्रधार विक्रांत शेट्टी, मोहम्मद सुहेल, राजकुमार मैथी आणि इतरांनी बळकावलेल्या ३९.२४ कोटींच्या ३१ मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या.
दरम्यान, या प्रकरणी ईडीने विक्रांत शेट्टी आणि राजकुमार मैथी या दोघांना अटक केली. त्यांना विशेष न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने प्रथम ईडीची कोठडी ठोठावली. ती संपल्यानंतर त्या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यानंतर विक्रांत शेट्टी याने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. जामीन अर्ज म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. ईडीने १२ एप्रिल २०२४ रोजी मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ अंतर्गत मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहैल उर्फ मायकल फर्नांडिस, विक्रांत शेट्टी, राजकुमार मैथी यांच्यासह ३६ जणांविरोधात म्हापसा येथील विशेष न्यायालयात (पीएमएलए) सुमारे ७४०० पानी आरोपपत्र दाखल केले. त्यात त्यांनी ३६ जणांना साक्षीदार केले आहे. या प्रकरणात ईडीने प्राथमिक ३१ मालमत्ता जप्त करून त्याची किमत ५३५ कोटी असल्याचा दावा केला. संशयित विक्रांत शेट्टी याने न्यायालयात दुसऱ्यांदा जामीन अर्ज दाखल केला. तो न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. शेट्टी याच्यातर्फे अॅड. विभव आमोणकर यांनी बाजू मांडून शेट्टी १५ फेब्रुवारी २०२४ रोजी पासून कोठडीत आहे. तसेच एसआयटीने दाखल केलेल्या संबंधित गुन्ह्यात न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे. याशिवाय दोन्ही गुन्ह्यातील तक्रारदारांनी दिवाणी न्यायालयात दाखल केलेले खटले आपापसात मिटवून निकालात काढले आहे. तसेच दोन्ही तक्रारदारांनी एसआयटीकडे दाखल केलेल्या तक्रारी मागे घेण्यात येणार असल्याचा युक्तिवाद न्यायालयात सादर केला. या प्रकरणी उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू एेकून घेतल्यानंतर शेट्टी याला सशर्त जामीन मंजूर केला.
ईडीकडून विक्रांत, राजकुमारला झाली होती अटक
ईडीने १५ फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्य सूत्रधार विक्रांत शेट्टी आणि राजकुमार मैथी या दोघांना चौकशीसाठी पाचारण केले होते. त्यावेळी ते दोघे माहिती लपवत असल्याचे समोर आल्यामुळे त्या दोघांना अटक केली होती.