फसवणूक प्रकरणी व्हिटोरीओला ३ दिवस पोलीस कोठडी

१३० कोटींच्या जमिनीचे बनावट गिप्ट डीड प्रकरण

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
01st December, 11:52 pm
फसवणूक प्रकरणी व्हिटोरीओला ३ दिवस पोलीस कोठडी

पणजी : पेन्ह द फ्रान्स येथील १३० कोटी रुपये किमतीच्या जमिनीचे बनावट गिप्ट डीड करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा शाखेने व्हिटोरीओ जुझे वेल्हो (कांपाल - पणजी) याला अटक केली आहे. व्हिटोरीओ याला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.

या प्रकरणी मारिया द वेल्हो व फर्नाडो जुझे द सिक्वेरा आल्मेडा यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराच्या पेन्ह द फ्रान्स येथील सर्व्हे क्र. ३५/१ आणि ३८/१ मधील ५० हजार चौ. मी. आणि १३० कोटी रुपये किमतीच्या जमिनीचे २६ आॅगस्ट २०२४ रोजी पूर्वी बनावट गिफ्ट डीड केल्याचे समोर आले. तसेच व्हिटोरीओ जुझे वेल्हो, त्याची पत्नी मारीनेला यांनी षड्‌यंत्र रचून बनावट दस्तावेज तयार केल्याचा दावा केला. तसेच व्हिटोरिओसह प्रजय प्रशन्ना शिरोडकर, अरूण कुमार गुप्ता, गंगा प्रसाद कुशवाहा आणि अनुराग कुशवाहा या संशयितांच्या विरोधात तक्रार दाखल केली. हा प्रकार तक्रारदारांच्या जमिनीची कागदपत्रे बार्देश मामलेदार समोर म्युटेशन करण्यासाठी सादर केल्यामुळे समोर आला. तक्रारीची दखल घेऊन गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विकास दयेकर यांनी वरील संशयितांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलम अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यानंतर वरील दाव्यात तथ्य असल्याचे समोर आल्यानंतर गुन्हा शाखेने व्हिटोरीओ जुझे वेल्हो याला शनिवार ३० नोव्हेंबर रोजी अटक केली. त्याला पोलीस कोठडीसाठी रविवार, १ डिसेंबर रोजी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयिताला तीन दिवस पोलीस कोठडी ठोठावली. 

हेही वाचा