चक्रीवादळ खाद्यपदार्थांच्या किमती वाढवण्याशिवाय पर्याय नाही
पणजी : आधीच ग्राहकांची अल्प संख्या त्यात भाजीपाला व इतर गृहोपयोगी वस्तू महागल्या असून या महागाईबरोबरच पर्यटकांची घटती संख्याही चिंतेचे कारण बनले आहे. हे असेच सुरू राहिल्यास आमच्याकडे खाद्यपदार्थांच्या किमती वाढवण्याशिवाय पर्याय नाही, असे रेस्टॉरंट आणि शॅक मालकांनी सांगितले.
बाजारात सध्या कांदा, टोमॅटो, बटाटे व इतर भाज्यांसह कडधान्यांचे भावही शिगेला पोहोचले आहेत. या महागाईचा फटका रेस्टॉरंट आणि शॅक मालकांना बसला आहे. बाजारात सर्वच वस्तू महाग होत आहेत, पण खाद्यपदार्थांचे दरमात्र तसेच आहेत त्यामुळे आम्हाला काहीच फायदा मिळत नाही, अशी खंत रेस्टॉरंट आणि शॅक मालकांनी व्यक्त केली.
ऑल गोवा हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष गौरीश धोंड म्हणाले, गोव्यात पर्यटकांची संख्या कमी असून, वाढत्या महागाईमुळे नको जीव केला आहे. भाज्यांबरोबरच कडधान्येही महागली आहेत. तसेच भविष्यात विमानाचे इंधनही महाग होणार असून तामिळनाडू, पुद्दुचेरी भागात चक्रीवादळामुळे पर्यटकांचे प्रमाणही कमी झाले आहे. अनेक विमानांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून काही रद्द करण्यात आली आहेत. पर्यटकांची घटती संख्या आणि महागाई आमच्यासाठी कठीण परिस्थिती असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, येत्या ८ ते १० दिवसांत परिस्थिती सुधारेल आणि व्यवसाय पुन्हा सुरळीत सुरू होईल, अशी आशा आम्ही बाळगून आहोत, असेही त्यांनी सांगितले. भाजप सत्तेत येण्यापूर्वी दर पाच वर्षांनी दारूच्या घाऊक दरात वाढ होत असे. मात्र, आता हे दर दरवर्षी वाढत आहेत. पूर्वी शॅकचे दर महाग असल्याचे बोलले जात असे. पण आता रेस्टॉरंटच्या किमती शॅकपेक्षाही महाग झाल्या आहेत. याचे कारण रेस्टॉरंट्सनाही किमतींचा फटका बसतो आणि शॅकमध्ये जास्त स्पर्धा होऊ लागली आहे. शॅक फक्त माशांवर नफा कमावते. समुद्रकिनारी बाजारभावाने आम्हाला मासे खरेदी करता येते. मासळीच्या किमती आपण बदलू शकतो पण इतर खाद्यपदार्थांच्या किमती सारख्याच ठेवाव्या लागतात. पण अलीकडे समुद्रकिनारी मासे खाणारे पर्यटक मिळणे फार कठीण आहे, असे कार्दोझ म्हणाले.
महागाईचा शॅक व्यवसायालाही बसला फटका
पारंपरिक शॅक ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष मॅन्युएल कार्दोझ म्हणाले, यावर्षी महागाईमुळे शॅक व्यवसायालाही फटका बसला आहे. दिवाळीच्या कालावधीत चांगला व्यवसाय होता. पण, गेल्या आठ दिवसांपासून हा व्यवसाय ठप्प झाला आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे त्यामुळे येणारा पैसा बाजार खरेदीसाठी द्यावा लागतो. शॅकमध्येही लोकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे आम्हाला कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे, अशी तक्रारही त्यांनी केली.
पूर्वी भाजीचे दर ५ ते १० रुपयांनी वाढल्यास फरक जाणवत नसे. पदार्थाच्या सर्व किमती संगणकीकृत आणि इतर वितरण कंपन्यांशी सहमत असतात. पण, जेवणामागील मार्जिन कमी झाली आहे. आधी १५ रुपये फायदा होत असे. पण आता तो ८ ते १० रुपये एवढाच होतो. पुढील आठ दिवसांत परिस्थिती न सुधारल्यास आम्हालाही जेवणाचे भाव वाढवावे लागतील. _गौरीश धोंड, अध्यक्ष, गोवा हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशन