ऑक्टोबरमध्ये ९७ वर्षांतील पाचव्या सर्वाधिक पावसाची नोंद

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
6 hours ago
ऑक्टोबरमध्ये ९७ वर्षांतील पाचव्या सर्वाधिक पावसाची नोंद

पणजी : अरबी समुद्रातील (Arabian Sea) कमी दाबाचा पट्टा तसेच पूर्व किनारपट्टीवर धडकलेल्या मोंथा चक्रीवादळामुळे (Cyclone Montha) यंदा ऑक्टोबर महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.

गोव्यात (Goa Rain) १ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान सरासरी १४.७८ इंच पाऊस पडला. यामुळे यंदाच्या ऑक्टोबर मध्ये मागील ९७ वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील पाचव्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली. याआधी ऑक्टोबर २०१९ मध्ये सर्वाधिक २१.५२ इंच पावसाची नोंद झाली होती.

शुक्रवारी राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरू होता.  अधून मधून मध्यम स्वरूपाच्या पावसाची सरींची नोंद झाली. हवामान खात्याने १ ते ६ नोव्हेंबर दरम्यान तुरळक स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

या सहा दिवसांसाठी पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. राज्यात चोवीस तासात सरासरी ११.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शुक्रवारी पणजीत कमाल ३२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

राज्यात १ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान मुरगावमध्ये सर्वाधिक १९.६० इंच पावसाची नोंद झाली. पेडणेमध्ये १९.५९ इंच, धारबांदोडामध्ये १८.३१ इंच, पणजीत १८.०६ इंच, काणकोणमध्ये १७.३२ इंच, जूने गोवेमध्ये १५.६५ इंच, दाबोळीत १४.४० इंच, म्हापसामध्ये १४.३७ इंच, साखळीत १३.२५ इंच, मडगावमध्ये १०.४५ इंच, केपेमध्ये ९.८५ इंच, फोंडामध्ये ९.४१ इंच तर सांगेमध्ये ९.१५ इंच पावसाची नोंद झाली. 

सहा महिन्यांत १६४ इंच पावसाची नोंद 

राज्यात १ मे ते ३१ ऑक्टोबर दरम्यान १६३.९८ इंच पावसाची नोंद झाली आहे. मे महिन्यात २५.७७ इंच, जूनमध्ये ३१.३४ इंच, जुलैमध्ये ४६.६९ इंच, ऑगस्टमध्ये ३५.२२ इंच, सप्टेंबरमध्ये १०.१७ इंच, ऑक्टोबरमध्ये १४.७८ इंच पावसाची नोंद झाली.

ऑक्टोबर महिन्यातील सर्वाधिक पाऊस 

वर्ष / पाऊस (इंचात)

२०१९ / २१.५२

२००६ / १६.६८

१९५५ / १६.२६

१९८५ / १५.५२

२०२५/ १४.७८

२००९ / १३.८५

१९३१ / १३.५४ 

१९२८ / १३.०९

२०१० / १२.८१

२०२४ / ११.८१


हेही वाचा