नगरपालिका क्षेत्रात रवी नाईक यांचा पुतळा : स्मारक उभारण्याचा ठराव मंजूर

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
5 hours ago
नगरपालिका क्षेत्रात रवी नाईक यांचा पुतळा : स्मारक उभारण्याचा ठराव मंजूर

फोंडा : फोंडा नगरपालिका (Ponda Muncipality) क्षेत्रात माजी मुख्यमंत्री दिवंगत रवी नाईक (Ravi NaiK) यांचा पुतळा (Statue) व स्मारक उभारण्याचा ठराव फोंडा नगरपालिकेच्या बैठकीत संमत करण्यात आला. ज्येष्ठ नगरसेवक व्यंकटेश नाईक यांनी सदरचा ठराव पालिकेसमोर ठेवला होता. नगराध्यक्ष आनंद नाईक यांनी सर्व नगरसेवकांची संमती घेऊन ठराव मंजूर झाल्याचे जाहीर केले.

त्याचबरोबर प्रस्तावित ‘रिवर फ्रंट गार्डन’ प्रकल्पाला रवी नाईक यांचे नाव देण्याचे, तसेच नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत रवी नाईक यांचे तैलचित्र लावण्याचा ठराव सुद्धा मंजूर करण्यात आला.

पालिका बैठक होण्याअगोदर नगरपालिका मंडळ व नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने रवी नाईक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोक सभा घेण्यात आली. 

यावेळी श्रद्धांजली वाहताना नगराध्यक्ष आनंद नाईक म्हणाले की, सतत कार्यरत कसे राहावे हे रवी नाईक यांनी आपल्या कार्यशैलीतून आम्हाला दाखवून दिले आहे.

फोंडा तालुका व आसपासच्या परिसरात आज जेवढे मोठे महत्त्वकांक्षी प्रकल्प उभे आहेत, त्यांचे श्रेय रवी नाईक यांनाच जाते. ते खऱ्या अर्थाने महान होते. सौम्य बोलून अधिकाऱ्यांकडून आपली कामे कशी करून घ्यावीत, हे त्यांचे कसब शिकण्यासारखे होते.

 उपनगराध्यक्ष दीपा कोलवेकर म्हणाल्या की, नव्या लोकप्रतिनिधींना ते नेहमी उपदेश करत असत. त्यांची उणीव कायम भासत राहील.

नगरसेवक व भावी नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर म्हणाले की, विकास पुरुष म्हणजे काय याची महती आम्हाला रवी नाईक यांचे कार्य पाहिल्यानंतर दिसून येते. नगरसेवक गीताली तळावलीकर म्हणाल्या की, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या रवी नाईक यांनी भावी पिढीसमोर अनेक आदर्श निर्माण करून ठेवले आहेत.

त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात सर्वांचेच भले करण्याचा प्रयत्न केला. नगरसेवक व्यंकटेश नाईक म्हणाले की, ह्या कार्यकाळात सुद्धा रवी नाईक यांनी अनेक प्रकल्प मार्गी लावले होते. ते सर्व प्रलंबित प्रकल्प कमी अवधीत पूर्ण करून त्यांना खरी श्रद्धांजली देऊया. त्यांच्या जाण्याने बहुजन समाजालाच नाही तर प्रत्येक समाजातील घटकाला दुःख झाले आहे.

 

हेही वाचा