
पणजी : वाहतूक खात्याने (Goa Transport Department) ओला इलेक्ट्रिक (Ola Electric Vehicles) वाहनात कंपनीचे ट्रेड सर्टिफिकेट (टीसी) (Trade Certificate) आणि ऑनलाइन नोंदणी (Online Registration) तात्पुरती स्थगित केली आहे. स्थगिती उठेपर्यंत कंपनीला राज्यात नवीन वाहनांची विक्री करता येणार नाही.
ग्राहकांच्या सर्व समस्यांचे निराकरण झाल्यावर स्थगिती काढण्यात येणार असल्याचे खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी राज्यभरातील ओला वाहन मालकांनी खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन याविषयी तक्रार दाखल केली.
वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाहतूक खाते तसेच ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे ओला इलेक्ट्रिक वाहनांच्या खराब विक्री पश्चात सेवेबाबत राज्यभरातून तक्रारी आल्या आहेत. आयोग त्यांच्या नियमानुसार या तक्रारी हाताळते. वाहतूक खात्यातर्फे कंपनीला देण्यात येणारे ट्रेड सर्टिफिकेट देणे बंद करण्यात आले आहे.
कंपनी डीलरला आरटीओकडून टीसी न मिळाल्याने नवीन वाहने रस्त्यावर आणता येणार नाहीत. तसेच कंपनीची नोंदणी प्रक्रिया देखील ऑनलाइन पद्धतीने ब्लॉक करण्यात आली आहे.
तत्पूर्वी ओला वाहन ग्राहकांनी माध्यमांशी संवाद साधला. धर्मा नाईक यांनी सांगितले की, ओला कंपनीची विक्री पश्चात सेवा अत्यंत खराब झाली आहे. कंपनीकडे सर्व सुविधा असणारे सर्विसिंग सेंटर नाही, दुरुस्तीसाठी तंत्रज्ञ नाहीत, वाहनाचे स्पेअर पार्ट देखील वेळेवर उपलब्ध होत नाहीत.
वाहन खराब झाल्यास किमान आठ महिने तरी पुन्हा मिळत नाही. कंपनीच्या वेर्णा येथील सर्विसिंग सेंटर मध्ये किमान ८०० ते १००० गाड्या पडून आहेत. याबाबत आम्ही मुख्यमंत्री कार्यालयाशी हस्तक्षेप केल्यावरच कंपनीने नवीन तंत्रज्ञ बोलवले आहेत.
अजित परब यांनी सांगितले की, केंद्र तसेच गोवा सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीसाठी प्रोत्साहन देत आहे. सरकारकडून अनुदान देखील दिले जात आहे. इलेक्ट्रिक वाहन घेतल्यावर त्यांना विक्री पश्चात सेवा चांगली मिळत नाही.
राज्यात ओला कंपनीची पाच ते सहा शोरूम आहेत. राज्यात ठिकठिकाणी सर्विस सेंटर होती. मात्र, मागील दोन-तीन महिन्यात ती बंद करून वेर्णा येथे केवळ एकच सर्विस सेंटर सुरू ठेवण्यात आले आहे. मात्र येथे योग्य सेवा मिळत नाही. सध्या वॉरंटी मध्ये असणारी वाहने देखील येथे पडून आहेत.