वाटमारीतून प्रकार घडल्याचा अंदाज

म्हापसा : पिर्ण-बार्देश ( Bardez, Goa) येथील पठारावर एका २५ ते ३० वयोगटातील तरुणाचा मृतदेह (Dea Body) आढळला आहे. मयताच्या शरीरावर मारहाणीमुळे झालेल्या गंभीर जखमा असल्याने त्याचा खून झाल्याचा (Suspected Murder) अंदाज पोलिसांनी (Goa Police) व्यक्त केला आहे.
दीपक कुमार असे मयताचे नाव असून तो ईशान्य भारत किंवा नेपाळ मधील रहिवासी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज शुक्रवारी सकाळी ८.३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पिर्णहून थिवीकडे येणार्या मार्गावरील केळ पिर्ण व खरगाळी कान्सा थिवी सीमेवर पठार भागात रस्त्याच्या कडेला एक युवक निपचित पडला असल्याचे रस्त्यावरून येजा करणार्या लोकांच्या निदर्शनास आले.
माहिती मिळताच १०८ रूग्णवाहिकेतून मयताचा मृतदेह म्हापसा जिल्हा इस्पितळात नेण्यात आला. तिथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले व घटनेची माहिती कोलवाळ पोलिसांना दिली.
मयतावर लाथाबुक्क्यांनी केलेल्या मारहाणीच्या गंभीर जखमा होत्या. त्यामुळे याच कारणास्तव त्याचा मृत झाला असावा असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला.
मयत युवक हा काल गुरूवारी रात्री कान्सा थिवी येथे दारूच्या नशेत पिर्णच्या बाजूने जाताना अनेकांच्या नजरेस पडला होता. वाटेत अनेकांकडे त्याने लिफ्ट मागण्याचा प्रयत्नही केला होता. चालत जाताना अज्ञात वाहनस्वारांकडे त्याची झटापट झाली असावी व लुटीच्या उद्देशाने त्याला मारझोड केली असावी असा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मयताकडे पोलिसांना एक ओळखपत्र सापडले असून, सदर ओळख पत्रावर दीपक ठाकूर असे नाव आहे. तर सदर ओळखपत्रावर पत्ता लिहिलेला नव्हता. पण मयत व्यक्तीचा चेहरा हा ईशान्य भारत आणि नेपाळ मधील लोकांप्रमाणे असून तो त्याच परिसरातील असावा असा अंदाज पोलिसांनी बांधला असून त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
पोलीस निरीक्षक निखिल पालेकर व सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राहूल गुप्ता व उपअधीक्षक विल्सन डिसोझा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास कोलवाळ पोलीस करीत आहेत.