केंद्रीय रसायने राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांची माहिती
पणजी : मागील तीन वर्षांत राज्यातील फार्मास्युटीकल उत्पादनांच्या निर्यातीत वाढ होत आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये गोव्यातून झालेल्या फार्मास्युटीकल उत्पादनांच्या निर्यातीत तब्बल १,५०५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. केंद्रीय रसायने राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. याबाबत खासदार संतोष कुमार पी यांनी राज्यसभेत अतारांकीत प्रश्न उपस्थित केला होता.
उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, गोव्यातून २०२१-२२ मध्ये ५ हजार २२ कोटी रुपयांची फार्मास्युटीकल उत्पादनांची निर्यात झाली होती. २०२२-२३ मध्ये त्यात सुमारे ३०० कोटींची वाढ होऊन ५ हजार ३२९ कोटींची निर्यात झाली. तर २०२३-२४ मध्ये ६ हजार ५२७ कोटी रुपयांच्या फार्मास्युटीकल उत्पादनांची निर्यात झाली. २०२३ -२४ मध्ये फार्मा उत्पादन निर्यातीत गोवा देशात सातव्या स्थानी राहिला. यावर्षी सर्वाधिक २९ हजार १४८ कोटी रुपयांची निर्यात तेलंगणातून झाली होती.
आर्थिक वर्ष २०२१-२२ आणि २०२२-२३ मध्ये देखील गोवा फार्मा उत्पादन निर्यातीत देशात सातव्या स्थानी होता. संपूर्ण देशाचा विचार करता आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये फार्मास्युटीकल उत्पादनांची निर्यात ही ८२ हजार कोटी रुपयांची होती. २०२२-२३ मध्ये १ लाख कोटी तर २०२३-२४ मध्ये १.१५ लाख कोटी रुपयांच्या फार्मास्युटीकल उत्पादनांची निर्यात झाली होती. भारतीय मार्केटमध्ये फार्मास्युटीकल उत्पादनांची किंमत साधारणपणे ५० अरब अमेरिकन डॉलर आहे.
उत्तरात म्हटले आहे की, सध्या देशात सुमारे २३.५ अरब अमेरिकन डॉलर किमतीची फार्मास्युटीकल उत्पादने वापरली जातात. तर २६.५ अरब डॉलर किमतीची उत्पादने निर्यात केली जातात. फार्मास्युटीकल उत्पादन निर्यातीत भारत जगात तिसऱ्या स्थानी आहे. तसेच देशात किफायशीर दरातील सुमारे ६० हजार जेनरिक औषधे बनवली जातात. संपूर्ण जगात निर्यात होणाऱ्या एकूण जेनरिक औषधांपैकी २० टक्के देशातून निर्यात होतात.