बादल सुखरूप तर संशयित पोलिसांच्या ताब्यात. अकाल तख्तने सुनावलेल्या शिक्षेनुसार सुखबीर सिंग बादल स्वर्णमंदिरात सेवा बजावण्यासाठी हजर झाले होते.
अमृतसर : पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलचे जेष्ठ नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. अमृतसरच्या स्वर्णमंदिरात एका हल्लेखोराने त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यातून बादल सुखरूप बचावले आहेत. सुखबीर सिंग यांना सोमवारी अकाल तख्तने धार्मिक शिक्षा सुनावली होती व त्याचीच अंमलबजावणी ते करत होते.
या संपूर्ण अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्वप्रथम एक व्यक्ती सुखबीर सिंह बादल यांच्या जवळ येतो आणि बंदूक काढतो, त्याचदरम्यान त्यांच्या जवळ उपस्थित असलेले लोक त्या व्यक्तीला पकडतात. यादरम्यान तो अनेक वेळा गोळीबार करतो. बादल यांच्या दोघा सुरक्षा रक्षकांनी वेळेवरच या हल्लेखोराला अडवल्याने मोठा अनर्थ टळला.
दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, सदर हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. दरम्यान या व्यक्तीचे नाव नारायण सिंह चौडा असून या आधीही अनेक समाजविघातक कृत्यांमध्ये सहभाग आढळून आला आहे. यामुळे अनेक वेळा त्यास तुरुंगवास झाला असल्याची तसेच त्याचा संबंध खालिस्तानी अतिरेक्यांशी असल्याची माहिती देखील आता समोर येत आहे.
दरम्यान अकाल तख्तने सुखबीर बादल यांच्यासह २००७ ते २०१७ दरम्यान कॅबिनेट मंत्री असलेल्या बहुतेक लोकांना शीख परंपरेनुसार शिक्षा सुनावली होती. २०१५ मध्ये अकाल तख्तच्या वतीने शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे कार्यकारी सदस्य आणि तख्तांच्या काही माजी जत्थेदारांनाही बोलावण्यात आले होते.