योजनेअंतर्गत व्यवसायासाठी मिळते पाच लाखांचे कर्ज
पणजी : राज्यातील ८६६ महिलांनी आतापर्यंत केंद्र सरकारच्या लखपती दीदी या योजनेचा लाभ घेतल्याचे केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी यांनी लोकसभेतील लेखी प्रश्नाला दिलेल्या उत्तरातून समोर आले आहे.
आर्थिकदृष्ट्या वंचित महिलांना बिनव्याजी पाच लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देणे हे लखपती दीदी या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. महिला आर्थिक अडचणींपासून मुक्त होऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास आणि वाढविण्यास सक्षम व्हाव्या, या हेतूने सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा राज्यातील आतापर्यंत ८६६ महिलांनी लाभ घेतल्याचे मंत्री चंद्रशेखर पेम्मासानी यांनी सादर केलेल्या आकडेवारीतून दिसून येते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी १८ ते ५० वयोगटातील महिला अर्ज करू शकतात. घरातील कोणताही सदस्य सरकारी नोकरदार नको. तसेच महिला, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी असावे, अशा योजनेसाठी अटी आहेत. योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आणि त्याचा लाभ मिळवण्यासाठी महिलांना 'सेल्फ हेल्प ग्रुप' व्यवसाय योजना तयार करावी लागते. व्यवसाय आराखडा तयार झाल्यानंतर बचत गट योजना आणि अर्ज सरकारकडे पाठवते. सरकारकडून अर्जाची छाननी आणि पुनरावलोकन झाल्यानंतर पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळतो. योजनेत सहभागी होण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, पासपोर्ट साइज फोटो, मोबाईल नंबर हे दस्तावेज असणे आवश्यक आहे.