युवकाला १०.३५ लाखांना गंडविल्याप्रकरणी आणखी दोन दिवस कोठडी
पणजी : लेखा संचालनालयात अकाऊंटन्टची नोकरी देण्याचे आमिष दाखवून नादोडातील एका युवकाला १०.३५ लाखांचा गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणी पणजी पोलिसांनी दीपाश्री प्रशांत महतो उर्फ सावंत उर्फ गावस हिला अटक केली. तिला पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने आणखीन दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
अर्जुन वामन देसाई (वाडी नादोडा, बार्देश) यांनी पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, संशयित दीपाश्री हिने २०१८ मध्ये तक्रारदाराला लेखा संचालनालयात अकाऊंटन्टची नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून १०.३५ लाख रुपये घेतले. त्यानंतर संशयित महिलेने नोकरी दिली नाही किंवा घेतलेले पैसे परत केले नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदारांच्या लक्षात आल्यानंतर त्याने पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. पणजीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहन नागेशकर यांनी दीपाश्री सावंत हिच्या विरोधात भादंसंच्या कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यानंतर गुरुवार २८ नोव्हेंबर रोजी तिला अटक केली. दि. २९ नोव्हेंबर रोजी पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने तिला तीन पोलीस कोठडी ठोठावली होती. ती संपल्यानंतर सोमवारी न्यायालयात पुन्हा उपस्थित केले असता, न्यायालयाने दीपाश्रीला दोन दिवस पोलीस कोठडी ठोठावली. याच दरम्यान दीपाश्रीने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. पुढील सुनावणी ४ रोजी रोजी होणार आहे.