मुलीचे अपहरण करुन लैंगिक अत्याचार प्रकरणी युवक निर्दोष

२०१५ मधील प्रकरण : पुरावे सादर करण्यात अपयश

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
01st December, 11:49 pm
मुलीचे अपहरण करुन लैंगिक अत्याचार प्रकरणी युवक निर्दोष

पणजी : बार्देश तालुक्यातील १७ वर्षीय मुलीचे २०१५ मध्ये अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. या प्रकरणातील पीडित मुलगी आणि तिच्या आईची न्यायालयात उलटतपासणी करण्यात अपयश, याशिवाय डिएनए चाचणीचा अहवाल नकारात्मक आला होता. याची दखल घेऊन पणजी येथील जलदगती व पॉक्सो न्यायालयाने संशयित युवकाची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. याबाबतचा निवाडा न्या. दुर्गा मडकईकर यांनी दिला.

पीडित मुलीच्या वडिलांनी ५ डिसेंबर २०१५ रोजी म्हापसा पोलीस स्थानकात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, २ डिसेंबर २०१५ रोजी रात्री ८ वाजता तक्रारदाराच्या १७ वर्षीय मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचे म्हटले होते. म्हापसा पोलिसांनी बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. याच दरम्यान ३० डिसेंबर २०१५ रोजी पीडित मुलगी घरी आली. तिची आई तिला पोलीस स्थानकात घेऊन गेली. दरम्यान, पीडित मुलीचा जबाब नोंद केला असता, तिला मारहाण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले. याची दखल घेऊन पोलिसांनी ३१ डिसेंबर २०१५ रोजी संशयित युवकाविरोधात भादंसंच्या कलम ३६३, ३५४ व इतर कलम आणि बाल लैंगिक शोषण विरोधी कायदा २०१२ (पॉक्सो) कायद्याच्या ४,८, १२ कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. पीडित मुलगी आणि संशयित युवकाची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. दि. २९ जानेवारी २०१६ रोजी न्यायालयाने संशयित युवकाला सशर्त जामीन मंजूर केला. पोलिसांनी तपासपूर्ण करून संशयित युवकाविरोधात १२ ऑक्टोबर २०१८ रोजी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. वरील प्रकरण पाॅक्सो न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत असल्यामुळे १६ डिसेंबर २०२१ रोजी पाॅक्सो न्यायालयात वर्ग करण्यात आले.

सुनावणीवेळी पुरावे सादर करण्यात अपयश आल्याने न्यायालयाने संशयित युवकाची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.

डिएनए चाचणीचा अहवाल नकारात्मक

न्यायालयात सुनावणी झाली असता, पंच साक्षीदार, बिगर सरकारी संस्थेचे सदस्य, संशयित युवकाचा भाऊ तसेच तपास अधिकाऱ्यांची साक्ष नोंद करण्यात आली. त्यावेळी पीडित मुलगी आणि तिच्या आईची न्यायालयात उलटतपासणी करण्यात अपयशी ठरले. तसेच डिएनए चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्याचे समोर आले. याशिवाय पीडित मुलीच्या वयासंदर्भात कोणतीच चाचणी किंवा दस्तावेज सादर करण्यात आले नसल्याचे समोर आले. 

हेही वाचा