लुईस आंतोनियो कार्डीनल : जुने गोवेत फेस्ताला हजारो भाविकांची हजेरी
पणजी : सेंट फ्रान्सिस झेवियर हे देवाच्या वचनाचे खरे उपदेशक आहेत, असे उद्गार आर्च बिशप लुईस अांतोनियो कार्डिनल यांनी काढले. जुने गोवे येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या फेस्तदरम्यान मासचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोपचे भारत आणि नेपाळमधील दूत आर्च बिशप लियोपोल्द जिरेली, आर्चबिशप फिलीप नेरी कार्डीनल फेर्रांव, मानानजारी धर्मप्रांताचे बिशप जुझे, मापुतो धर्मप्रांताचे अधिकारी बिशप तोनीतो मुवानोवा, बडोदा धर्मप्रांताचे बिशप सेबासत्यांव मास्कारेन्हास, पोर्ट ब्लेर धर्मप्रांताचे बिशप आलेक्स डायस, गोवा-दमास धर्मप्रांताचे बिशप सिमियांव फर्नांडिस, वसई धर्मप्रांताचे बिशप मोन्सिन्योर तमास डिसोजा, विगार जेराल, फा. जुजे रेमेदियोस फर्नांडिस, पवित्र झेवियर दर्शन समितीचे निमंत्रक, फा. हेनरी फाल्कांव, बाजिलिकेंचे रेक्टर फा. पात्रिसीयो फर्नांडिस, धार्मिकांचे इपिस्कोपल विगार फा. ज्योकीं फर्नांडिस, फा. रामीरो लुईस आदी २३५ पाद्रींनी या फेस्तात सहभाग घेतला.
भाग्यवान सेंट फ्रान्सिस झेवियरने मिशनरी कार्याला अधिक चालना दिली. तसेच सर्व प्रकारच्या अडथळ्यांवर मात केली आणि देवाचे वचन घोषित केले. देवाच्या वचनाचे उद्घोषक होण्यासाठी नम्रता आणि प्रामाणिकपणा आवश्यक आहे, असे आवाहन आर्च बिशप कार्डिनल यांनी केले.फा. रामीरो लुईस यांनी कोकणी प्रवचन सादर केले. फा. हेनरी फाल्कांव यांनी उपस्थितांचे आभार मानले. डीकन स्लेटर आलेमांव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डेबोरा पेरेरा हाच्या मार्गदर्शनाखाली गायन मंडळांनी गायन सादर केले.
या मासासाठी गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस, राज्याचे मंत्री, आमदार, विदेशी राजदूत, सरकारी अधिकारी आदी उपस्थित होते.
दिवसभर १० मास (प्रार्थना सभा)होते. या मासाला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र अवशेषाचे दर्शन घेण्यासाठी शेकडो भाविकांनी रांगा लावल्या होत्या. चर्च परिसरात मोठी फेरी भरली आहे. यावेळी सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
खरा उपदेशक त्याचा संदेश देत नाही, तर देवाचे वचन सांगतो. त्यामध्ये तो आपला मोठेपणा शोधत नाही. आज समाजात सर्वत्र खोटे दूत आहेत, त्यांना देव समजले जाते आणि तेच समाज फोडण्याचे कार्य करतात. अशा प्रचारकांपासून लोकांनी दूर राहावे.
- आर्च बिशप लुईस अांतोनियो कार्डिनल