एस्कॉर्ट वेश्याव्यवसाय; तीन टॅक्सी चालकांचा सहभाग निश्चित

संशयित तिघेही बार्देशमधील : चौकशीसाठी बजावली नोटीस


03rd December, 11:48 pm
एस्कॉर्ट वेश्याव्यवसाय; तीन टॅक्सी चालकांचा सहभाग निश्चित

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने एस्कॉर्ट वेबसाईटवरून वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या सिंडिकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणात चार संशयितांना अटक केली होती. या प्रकरणात सहभाग असल्यावरून गुन्हा शाखेने बार्देश तालुक्यातील टॅक्सी चालक इमाम सुतार (रा. उसकई-पालये), उमेश बगळी (रा. बेती) आणि झीशान अली शेख (रा. मरड-म्हापसा) यांना संशयित केले आहे. वरील तिघांना चोकशीसाठी नोटीस पाठवली आहे.
गुन्हा शाखेने केलेल्या सखोल चौकशीत ७८ एस्कॉर्ट वेबसाईटवरून गोव्यात वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे दिसून आले. त्या वेबसाईट गुन्हा शाखेने ब्लॉक केल्या. त्यानंतर गुन्हा शाखेने उत्तरप्रदेशच्या गाजियाबादमधून योगेश कुमारला ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर सुभाष प्रधान (३२) याला अटक झाली. अधिक चौकशी केली असता, या प्रकरणात टॅक्सी चालकांचाही सहभाग असल्याचे समोर आले. त्यानुसार, गुन्हा शाखेने बार्देश तालुक्यातील इमाम सुतार (उसकई-पालये), उमेश बगळी (बेती) आणि झीशान अली शेख (मरड-म्हापसा) या टॅक्सी चालकांना संशयित केले. त्यांना गुन्हा शाखेने नोटीस बजावून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर पुढील तपास करत आहेत.
प्रकरणातील पहिली अटक आंध्र प्रदेशमधून
एस्कॉर्ट वेबसाईट बनवून गोव्यात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार, गोवा पोलिसांच्या सायबर विभागाच्या मदतीने गुन्हा शाखेने चौकशी सुरू केली. गुन्हा शाखेने आंध्र प्रदेशमधून सय्यद सुलतान उस्मान (५४) आणि मोहम्मद सलामतुल्लाह मोहेबुल्ला (३०) यांना प्रथम अटक केली. त्यांची चौकशी केली असता, यात इतरांचाही सहभाग असल्याचे समोर आले. 

हेही वाचा