बनावट ‘गिफ्ट डीड’ करून फसवणूक; दोघांकडून अटकपूर्व जामीन अर्ज दाखल

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
5 hours ago
बनावट ‘गिफ्ट डीड’ करून फसवणूक; दोघांकडून अटकपूर्व जामीन अर्ज दाखल

पणजी : पेन्ह द फ्रान्स येथील १३० कोटी रुपये किमतीच्या जमिनीचे बनावट गिफ्ट डीड करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा शाखेने व्हिटोरीओ जुझे वेल्हो (कांपाल-पणजी) याच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील संशयित गंगा प्रसाद कुशवाहा आणि अनुराग कुशवाहा या दोघांनी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ रोजी होणार आहे.

मारिया द वेल्हो व फर्नाडो जुझे द सिक्वेरा आल्मेडा यांनी गुन्हा शाखेत याबाबत तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराची पेन्ह द फ्रान्स येथील सर्व्हे क्र. ३५/१ आणि ३८/१ मधील ५० हजार चौ. मी. ही १३० कोटी रुपये किमतीची जमीन आहे. तक्रारदाराने व्हिटोरीओ जुझे वेल्हो, त्याची पत्नी मारीनेला, प्रजय प्रशन्ना शिरोडकर, अरूण कुमार गुप्ता, गंगा प्रसाद कुशवाहा आणि अनुराग कुशवाहा या संशयितांच्या विरोधात तक्रार दाखल केली. तसेच वरील संशयितांनी २६ आॅगस्ट २०२४ रोजी पूर्वी षड्‌यंत्र रचून बनावट दस्तावेज तयार केल्याचा दावा केला. हा प्रकार तक्रारदारांच्या जमिनीची कागदपत्रे बार्देश मामलेदार समोर म्युटेशन करण्यासाठी सादर केल्यामुळे समोर आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विकास दयेकर यांनी वरील संशयितांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलम अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. यानंतर गुन्हा शाखेने व्हिटोरीओ जुझे वेल्हो याला अटक केली. म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केल्यावर त्याला न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी ठोठावली. दरम्यान, संशयित गंगा प्रसाद कुशवाहा आणि अनुराग कुशवाहा या दोघांनी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. बुधवार, दि. ४ रोजी या अर्जावर सुनावणी होणार आहे.