न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलीस कोठडी ठोठावली
पणजी :वेर्णा पोलिसांनी म्हार्दोळ - वेर्णा येथील खुल्या मैदानावर छापा टाकून गांजा बाळगल्या प्रकरणी रोहन बिंद (२६, मिर्झापूर - उत्तरप्रदेश) या युवकाला अटक केली. त्याच्याकडून ४.२५ लाख रुपये किमतीचा ४.२५ किलो गांजा जप्त केला.
दरम्यान या बाबत वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हार्दोळ - वेर्णा येथील खुल्या मैदानाजवळ एक युवक गांजाची तस्करीसाठी येणार असल्याची माहिती अधिकाऱ्याला मिळाली होती. त्यानुसार, पोलीस अधीक्षक सुनीता सावंत आणि उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक निखिल नाईक देसाई, हवालदार अजीत शिरोडकर, कॉन्स्टेबल सतीश लकाडे, जगदेव दोत्रेकर, श्रीनिवास रेड्डी व इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने शनिवार सायंकाळी ४. ४५ ते ६.४५ दरम्यान संबंधित ठिकाणी सापळा रचला.
याच दरम्यान एक युवक त्या ठिकाणी आला असता, त्याची चौकशी केली. त्यावेळी पथकाने रोहन बिंद (२६, मिर्झापूर - उत्तरप्रदेश) युवकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ४.२५ लाख रुपये किमतीचा ४.२५ किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी उपनिरीक्षक रामचंद्र नाईक यांनी रोहन बिंद याच्याविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याचे कलम २०(बी) (ii) (बी) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयिताला पोलीस कोठडीसाठी रविवारी मडगाव येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलीस कोठडी ठोठावली.