कोंब मडगाव येथील प्रकार : पोलिसांत गुन्हा नोंद
मडगाव : कोंब मडगाव येथे वितळलेल्या सोन्याचे दागिने करणार्या तिघा कारागीरांनीच ७२ लाख रुपये किमतीचे ९५९ ग्रॅम सोने घेऊन पोबारा केला. याप्रकरणी प्रितेश प्रकाश लोटलीकर यांनी मडगाव पोलिसांत तक्रार दिल्यानंतर तिन्ही कारागीरांवर गुन्हा नोंद करण्यात आला.
प्रितेश लोटलीकर यांनी मडगाव पोलिसांत तक्रार नोंद केली आहे. सुप्रोकाश मोंडल (२९, रा. मिनाखाण, पश्चिम बंगाल), संजोय मोंडल (२२, रा. महाराजपूर, पश्चिम बंगाल) व तापस जना (४४, रा. महाराजपूर, नारायणपूर, प. बंगाल) हे तिघे कारागीर प्रितेश लोटलीकर यांच्याकडे वितळवलेल्या सोन्यापासून दागिने तयार करण्याचे काम करत होते. दि. २९ नोव्हेंबर रोजी रात्री पावणेअकरा वाजल्यापासून ३० नोव्हेंबर सकाळपर्यंतच्या कालावधीत या तिन्ही कारागीरांनी सोन्याचे दागिने करण्यासाठी दिलेले ९५९ ग्रॅम सोने घेऊन पळ काढला. या सोन्याची किंमत बाजारभावाप्रमाणे ७२ लाख रुपये इतकी आहे. याप्रकरणी मडगाव पोलिसांकडून तिन्ही संशयितांवर गुन्हेगारी कृत्य करत विश्वासघात केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी मडगाव पोलीस उपनिरीक्षक शुभम गावकर पुढील तपास करत आहेत.