तज्ज्ञांच्या मदतीने गोपकापट्टणम बंदराचे रहस्य शोधून काढणार

पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई : हेरिटेज धोरण तयार करणार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
5 hours ago
तज्ज्ञांच्या मदतीने गोपकापट्टणम बंदराचे रहस्य शोधून काढणार

आगशी गोपकापट्टणम बंदराची पाहणी करताना मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार वीरेश बोरकर व इतर मान्यवर. (समीप नार्वेकर)      

पणजी : तिसवाडी आगशी येथील प्राचीन गोपकापट्टणम बंदराचा सखोल अभ्यास केंद्रीय समितीकडून करण्यात येणार आहे. यासाठी हेरिटेज धोरण तयार केले जाणार आहे. बंदराच्या रेतीमध्ये अनेक रहस्ये दडलेली आहेत. तज्ज्ञांच्या मदतीने ती शोधणार आहोत, असे पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.
मंत्री सुभाष फळदेसाई यांनी झुआरी नदीच्या काठापासून काही अंतरावर असलेल्या गोपकापट्टणम बंदराची पाहणी केली. यावेळी स्थानिक आमदार वीरेश बोरकर, गोवा राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्थेचे तज्ज्ञ डॉ. एस. के. एस. गौर व पुरातत्व वास्तू विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री फळदेसाई म्हणाले की, सहाव्या शतकापूर्वी हे बंदर तत्कालीन राज्याची राजधानी असलेल्या गोवापुरीत हे बंदर होते, असा उल्लेख उल्लेख महाभारत आणि रामायणात आहे. हे वारसा स्थळ असून त्याचा वारसा धोरणात समावेश केला जाईल. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण बैठक घेऊन याबाबतचा अहवाल तयार करेल. परंतु सध्या, आम्ही तळागाळात शोध घेत आहाेत. या बंदराकडे लक्ष देण्याची गरज आहे. एनआयओने दीड मीटर क्षेत्र खोदले आणि आतमध्ये पुरात पायऱ्या सापडल्या. या बंदराचा उल्लेख महाभारतातही आहे आणि गोव्यात पौराणिक संस्कृती होती, याची साक्ष हे बंदर देते.
वाळूखाली काय दडले आहे, हे आम्हाला माहित नाही. पुरातत्व विभाग आणि एनआयओ वाळूखाली काय दडलेले आहे हे समजून घेण्यासाठी संयुक्त अभ्यास करतील, असे ते म्हणाले.
हे बंदर ८ किमी लांब आहे. पर्यावरणाची हानी न करता, आम्ही तज्ज्ञांशी बोलून हे ठिकाण जागतिक पर्यटनात अग्रस्थानी आणण्यासाठी गंभीर पावले उचलू. गोवा मुक्तीनंतर वीरेश बोरकर हे एकमेव आमदार आहेत ज्यांनी याची दखल घेतली आहे. त्यांनी १० टक्के अभ्यास केला आहे. आम्हाला दडलेला इतिहास उघड करणे आवश्यक आहे, असे फळदेसाई म्हणाले.
खोदकामात सापडल्या सहा पायऱ्या
आम्ही भरतीच्या रेषेवर बरेच बांधकाम पाहिले. जेव्हा आम्ही याचा सखोल अभ्यास करण्यास सुरुवात केली तेव्हा आम्हाला आढळले की भरतीच्या रेषेवर आणखी संरचना आहेत. आम्ही या सर्व बांधकामांची नोंद करून त्यानुसार काम सुरू केले. दीड मीटर खोल खोदल्यावर आम्हाला आतमध्ये सहा पायऱ्या सापडल्या, असे एनआयओचे तज्ज्ञ डॉ. गौर यांनी सांगितले. आम्ही आणखी खोदण्याचा प्रयत्न केला पण भरतीमुळे आम्हाला अडचणी येत होत्या. पण आम्ही लावलेला शोध अप्रतिम आहे आणि तो जतन करून भावी पिढ्यांना दाखवणे गरजचे आहे. त्यावेळी किती अत्याधुनिक तंत्रज्ञान होते. आपला इतिहास किती दैदिप्यमान होता, याची ते साक्ष देते. मंत्री व आमदारांनी या वास्तूत रस दाखवल्याने आम्हाला चांगले परिणाम मिळतील, याची खात्री आहे, असे गौर म्हणाले.