मंत्री नितीन गडकरी यांची माहिती; १,३७६ कोटी रुपये मंजूर
पणजी : राष्ट्रीय महामार्गाच्या बेंदोर्डे ते पोळे या काणकोण बायपासला जोडणाऱ्या २२.१० किमी लांबीच्या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी केंद्राने १,३७६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे काणकोण-कुंकळ्ळी आणि मडगाव मार्गांची जोडणी सुधारेल.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीट करून ही घोषणा केली. बेंदोर्डे ते काणकोण बायपास आणि काणकोण बायपास नंतर पोळेपर्यंत रस्त्याचे चौपदरीकरणाचा प्रस्ताव आहे. संपूर्ण अंतर २२.१० किमी आहे आणि राष्ट्रीय महामार्गाचा भाग आहे. सध्या काणकोणहून मडगाव किंवा कुंकळ्ळीला जाण्यासाठी बराच वेळ लागतो. चौपदरीकरणानंतर काणकोण ते कुंकळ्ळी किंवा काणकोण - मडगावकडे जाणारी वाहतूक सुरळीत होईल. मडगावहून कारवारमार्गे अनेकजण कर्नाटकात जातात. काही कारवारहून गोवामार्गे महाराष्ट्रातही जातात. या सर्वांना या चौपदरीकरणाचा फायदा होणार आहे. काणकोण तालुक्याचा संपूर्ण दक्षिण गोव्याशी संपर्क सुधारण्यासाठी हा प्रकल्प पूरक ठरेल, असे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले.
बेंदोर्डे, कोर्डे आणि बार्शे भागातील लोकांना चौपदरीकरणाचा फायदा होणार आहे. त्यामुळे या भागातील लोकांना कुंकळ्ळी किंवा मडगाव जलद पोहोचण्यास मदत होईल.
काणकोण बायपासने बरीच सोय केली असली तरी काणकोण बायपासला जोडणारा रस्ता खडीचा असल्याने वाहतुकीला विलंब होत होता. हा विलंब संपणार. मडगाव-काणकोण रस्त्यावरही अपघातप्रवण क्षेत्र आहेत. या क्षेत्रांचीही दुरुस्ती होईल, असे गडकरी यांनी म्हटले.