जनजागृतीनंतरही संख्या वाढली; पाच वर्षांत १५,८५८ जणांनी घेतले ‘एनएसीपी’अंतर्गत उपचार
पणजी : गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील एचआयव्ही बाधितांच्या संख्येत वाढच होत आहे. तर, गेल्या पाच वर्षांच्या काळात राज्यातील १५,८५८ एचआयव्ही बाधितांनी राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत (एनएसीपी) उपचार घेतल्याचे आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालातून समोर आलेले आहे.
२०१९-२० मध्ये राज्यात ३,०५८ एचआयव्ही बाधित रुग्ण आढळले होते. २०२०-२१ मध्ये यात घट होऊन ही संख्या ३,२७ झालेली होती. त्यानंतर मात्र एचआयव्ही बाधितांच्या संख्येत वाढ होत गेली. २०२१-२२ मध्ये ही संख्या ३,११८ झाली. २०२२-२३ मध्ये त्यात आणखी वाढ होऊन हा आकडा ३,२४६ झाला. तर, गतवर्षी ही संख्या ३,४०९ इतकी होती. या पाच वर्षांच्या काळात ज्या १५,८५८ एचआयव्ही बाधितांनी राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत उपचार घेतले, त्यात ८,०३६ पुरुष, ७,८०६ महिला आणि १६ तृतीयपंथींचा यात समावेश असल्याचे आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीतून हे दिसून येत आहे..
आरोग्य मंत्रालयाने गोव्यासह देशातील सर्व राज्यांतील या पाच वर्षांच्या काळातील एचआयव्ही बाधितांचा आकडा सादर केला आहे. त्यानुसार २०१९-२० मध्ये देशात १३,८०,१२८ रुग्ण आढळले होते. २०२०-२१ मध्ये १३,८८,३७६ जण, २०२१-२२ मध्ये १४,५०,२५९ जण, २०२२-२३ मध्ये १५,७४,३१६ आणि २०२३-२४ मध्ये १६,८८,९२५ जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे दिसते.