८७.०५ टक्के खासगी शाळांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी
पणजी : राज्यातील २९९ म्हणजे ३६.७३ टक्के सरकारी शाळांमध्येच इंटरनेट कनेक्टिव्हीटी उपलब्ध आहे. तर ८७.०५ टक्के खासगी शाळांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी असल्याचे शिक्षण मंत्रालयाने सादर केलेल्या अहवालातून समोर आले आहे.
राज्यात ज्या एकूण ८१४ सरकारी शाळा आहेत, त्यातील केवळ २९९ शाळांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे. हे प्रमाण केवळ ३६.७३ टक्के इतके आहे. यातून सुमारे ६३ टक्के सरकारी शाळांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्याचे दिसून येते. दुसऱ्या बाजूला राज्यात एकूण १३९ खासगी शाळा कार्यरत आहेत. त्यातील १२१ शाळांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे. हे प्रमाण ८७.०५ टक्के आहेत. यातून केवळ १३ टक्के खासगी शाळांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्याचे शिक्षण मंत्रालयाने सादर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होते.
सध्याच्या इंटरनेटच्या युगात राज्य सरकारांनी आपापल्या राज्यातील प्रत्येक सरकारी शाळेपर्यंत इंटरनेटची सुविधा पोहोचवावी, असे निर्देश काही वर्षांपूर्वी दिलेले आहेत. त्यानुसार गोवा सरकारही गेल्या काही वर्षांपासून या दृष्टीने प्रयत्न करीत आहे. परंतु, आतापर्यंत केवळ ३६ टक्केच सरकारी शाळांपर्यंत इंटरनेट पोहोचवण्यात सरकारला यश मिळाल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते.