१०० हून अधिक ठार, अनेक जखमी
कोनाक्री (गिनी) : एन'जारेकोर येथे रविवारी फुटबॉल सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये उफाळलेल्या संघर्षात १०० हून अधिक लोक ठार झालेत. तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. येथील स्टेडियमवर सर्वत्र मृतदेह विखुरल्याचे एका व्हिडिओत दिसत आहे. येथील पोलीस स्थानक देखील चिढलेल्या लोकांनी पेटवून दिले आहे.
दरम्यान, एन'जारेकोर येथील स्टेडियमवर गिनीचे अध्यक्ष मामादी डुम्बौया यांच्या सन्मानार्थ एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील एका सामन्यावेळी मैदानी पंचाने एक चुकीचा निर्णय दिला. यामुळे या निर्णयाचा फटका बसलेल्या संघाचा समर्थकांनी विरोधी संघाच्या समर्थकांशी हुज्जत घालण्यास व मारामारी करण्यास सुरुवात केली, पुढे याचे पर्यावसान दंगलीत झाले. लोकांना नियंत्रित करण्याचे पोलिसांचे प्रयत्न देखील सपशेल फोल ठरले. सध्या येथील इस्पितळ आणि शवागरात मृतदेहांचे खच पडले आहेत.