चितगाव : बांगलादेशात गेल्या तीन महिन्यांपासून अराजक माजले आहे. मात्र गेल्या दोन आठवड्यांत इस्लामी कट्टरवाद्यांनी हिंदू मंदिरांना लक्ष्य मोठ्या प्रमाणात केले आहे. आता चितगावमध्ये सुरू असलेल्या निदर्शने आणि हिंसाचाराच्या दरम्यान, कट्टरवाद्यांच्या जमावाने तीन हिंदू मंदिरांची तोडफोड केली आहे. हा हल्ला शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास हरिशचंद्र मुनसेफ लेन परिसरात झाला. संतानेश्वर मातृ मंदिर, शोनी मंदिर आणि शांतनेश्वरी कालीबारी मंदिराला लक्ष्य करण्यात आले.
बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारवर अल्पसंख्याक आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे. शुक्रवारी शेकडो लोकांच्या एका गटाने मंदिरांवर हल्ला केला, विटा आणि दगडांचा मारा सुरू केला आणि शोनी मंदिराच्या दरवाजांचे आणि इतर दोन मंदिरांचे नुकसान केले. मंदिराच्या अधिकाऱ्यांनी तुटलेला दरवाजा आणि इतर वस्तूंचे नुकसान झाल्याची पुष्टी केली.
कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रमुख अब्दुल करीम यांनी या बातमीस दुजोरा दिला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी जाणूनबुजून मंदिरांचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. संतानेश्वर मातृ मंदिर व्यवस्थापन समितीचे स्थायी सदस्य तपन दास यांनी सांगितल्यानुसार, हल्लेखोर हिंदुविरोधी आणि इस्कॉनविरोधी घोषणा देत होते. चिन्मय कृष्ण दास या इस्कॉनच्या पुजाऱ्याला अटक केल्यानंतर चितगावमध्ये हिंसाचार उसळला आहे. बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याला अटक केल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हल्ल्यादरम्यान मंदिर अधिकाऱ्यांनी हल्लेखोरांशी कोणतेही संभाषण केले नाही, परंतु परिस्थिती बिघडलेली पाहून लष्कराला पाचारण केले. लष्कराने तात्काळ कारवाई करून सुव्यवस्था पूर्ववत करण्यात मदत केली. या घटनेमुळे बांगलादेशातील हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्धांसह धार्मिक अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे.