‘एपस्टीन फाइल्स’मध्ये गोव्याचाही उल्लेख

बलात्कार, खुनाच्या घटनांची नोंद : ईमेल्समधून धक्कादायक माहिती समोर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
33 mins ago
‘एपस्टीन फाइल्स’मध्ये गोव्याचाही उल्लेख

पणजी : संपूर्ण जगात खळबळ उडवून देणाऱ्या अमेरिकेतील ‘एपस्टीन फाइल्स’मध्ये (Epstein Files) आता गोव्याचा संदर्भ समोर आला आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने सार्वजनिक केलेल्या कागदपत्रांमध्ये, जेफरी एपस्टीनच्या (Jeffrey Epstein) सहकाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या ‘ट्रॅव्हल अॅडव्हायझरी’मध्ये (Travel Advisory) काणकोण (cancon) येथील आयरिश महिलेवरील बलात्कार व खून प्रकरण आणि हरमल (Harmal) येथील अमेरिकन महिलेवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेची नोंद असल्याचे उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्च २०१७ मध्ये एका ट्रॅव्हल कंपनीने एपस्टीनच्या सहकाऱ्यांना ईमेलद्वारे जागतिक गुन्हेगारीच्या घटनांची माहिती दिली होती. या मेलमधील भारताच्या संदर्भात गोव्यातील दोन प्रमुख घटनांचा उल्लेख करण्यात आला होता. १३ मार्च २०१७ रोजी होळी साजरी करण्यासाठी गोव्यात आलेल्या एका आयरिश महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. १५ मार्च रोजी पोलिसांनी याप्रकरणी काणकोणमधून एकाला अटक केली होती. या घटनेचा उल्लेख करून पर्यटकांनी गोव्यात विशेष खबरदारी घेण्याची गरज अॅडव्हायझरीमध्ये व्यक्त करण्यात आली होती.

७ फेब्रुवारी २०१७ रोजी एका योग शिक्षकाने मसाज शिकवण्याच्या बहाण्याने अमेरिकन महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झाला होता. याप्रकरणी योग शिक्षकाला अटक झाली होती. अनोळखी व्यक्तींकडून पेये स्वीकारणे किंवा निर्जन ठिकाणी एकटे फिरणे टाळण्याचा सल्ला या अॅडव्हायझरीत देण्यात आला होता.

एपस्टीनचे दोन सहकारी होते गोव्यात!

केवळ गुन्ह्यांची नोंदच नाही, तर जेफरी एपस्टीनचे दोन जवळचे सहकारी गोव्यात वास्तव्यास होते आणि त्यांनी तिथून एपस्टीनशी संवाद साधल्याचे मेल्सवरून स्पष्ट झाले आहे. २०११ मध्ये अमेरिकन उद्योगपती थॉमस प्रिट्झकर यांनी एपस्टीनला पाठवलेल्या मेलमध्ये ते स्वतः गोव्यात असल्याचे नमूद केले होते. ‍तर सप्टेंबर २०१६ मध्ये हाँगकाँग पॉलिटेक्निक विद्यापीठाचे गिनो यु यांनीही आपण गोव्यात असल्याचे मेलद्वारे एपस्टीनला कळवले होते.