मुंबई : 12वी फेल, साबरमती रिपोर्ट, सेक्टर 36, ‘हसिना दिलरुबा’, छपाक सारख्या वेगळ्या धाटणीच्या आणि आशयघन चित्रपटांद्वारे परिपक्व अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता विक्रांत मॅसीने सोशल मिडियावर एक क्रिप्टिक पोस्ट करत आपण चित्रपटसृष्टीतून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. विक्रांतच्या या पोस्टमुळे जगभरातील त्याच्या चाहत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.
पहा पोस्ट..
२००६ साली छोट्या पडद्यावरुन आपल्या कारकिर्दीची सुरुवात केलेल्या विक्रांतने धरम वीर, बालिका वधू, कुबूल है यांसारख्या टीव्ही शोमध्ये काम केले. छोट्या पडद्यावर आपली छाप सोडल्यानंतर तो बॉलिवूडकडे वळला. विक्रांत मॅसीने २०१३ मध्ये लुटेरा चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले . यानंतर त्यांनी दिल धडकने दो, छपाक यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले. या अभिनेत्याने अनेक चित्रपट केले, परंतु 12वी फेल हा त्याच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट ठरला. या चित्रपटात त्यांनी आयपीएस मनोज कुमार यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील विक्रांतच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यांना अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले.
नुकताच त्याचा 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्याचे खूप कौतुक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले. पण, विक्रांत मॅसीचा चित्रपट 'द साबरमती रिपोर्ट' १५ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला तेव्हा विक्रांतला धमक्या आल्या होत्या. हा चित्रपट गोध्रा कांड आणि त्यानंतरच्या गुजरात दंगलीवर आधारित आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला होता.
दरम्यान त्याला व त्याच्या परिवाराला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याने त्याने चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. मागेच विक्रांतने चित्रपटाच्या स्क्रीनिंग नंतर पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देताना समाजातील अनेक गोष्टीवर भाष्य केले. 'मी नेहमीच वेगळ्या धाटणीचे चित्रपट करण्यावर भर दिला आहे. मला कोणत्याही भूमिका साकारताना 'स्व' शोधणे आवडते. यासाठी मी नेहमीच आव्हानात्मक पटकथांना प्राधान्य देतो.' असे तो एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाला होता.
गुजरात दंगलीवर आधारित चित्रपटात काम केल्यामुळे त्याला अनेक कट्टरपंथियांच्या धमक्या येत असल्याचे यावेळी त्याने सांगितले होते. तो म्हणाला, 'मला व्हॉट्सॲपवर धमकीचे मेसेज येत आहेत. मी नऊ महिन्यांपूर्वीच एका मुलाचा बाप बनलो. तो अजून चालायलाही शिकलेला नाही. त्याच्याबद्दल चुकीच्या पद्धतीने बोलले जात आहे. आपण कोणत्या युगात जगत आहोत हेच समजत नाही, हा फक्त एक चित्रपट आहे आणि मी कलाकार आहे, एखाद्या कलाकाराला किंवा तो साकारत असलेल्या कलेला फक्त एखाद्या विचाराशी आपले पटत नाही ही सबब देत दाबणे कितपत योग्य आहे ? असा प्रश्न त्याने विचारला होता.
'जर्मनीच्या नाझी सैन्याने हजारो ज्यूंची हत्या केली. त्यावर अनेक चित्रपट बनले आणि त्याला पुरस्कारही मिळाले. त्याचप्रमाणे अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकले, त्यावर अनेक पुरस्कार विजेते चित्रपट तयार झाले. मग इथे घडणाऱ्या घटनांवर चित्रपट बनवायचा असेल तर इतका विचार का करावा लागतो ?' असेही त्याने यावेळी म्हटले होते.
'साबरमती रिपोर्टची स्क्रिप्ट नक्कीच चॅलेंजिग होती पण, यातील काही गोष्टींवर मला प्रकाश टाकावे व नेमके सत्य लोकांसमोर आणावे असे वाटले, म्हणून हा चित्रपट मी स्वीकारला. मी जेव्हा ही स्क्रिप्ट घेऊन माझ्या पत्नीकडे गेलो तेव्हा तिने काही पाने वाचली व 'तू ठार वेडा झालायस का ?' असा प्रश्न विचारल्याचे त्याने सांगितले. एकंदरीत काय होणार याची कल्पना होतीच पण, कलेच्या प्रेमाखातर आपण काही गोष्टी स्वीकारतोच नाही का ? असेही तो यावेळी म्हणाला होता. हा संपूर्ण चित्रपट पत्रकारितेच्या दृष्टीकोनातून तयार करण्यात आला आहे. त्यावेळच्या पत्रकारांनी गोध्रा घटना कशी मांडली यावर चित्रपटाची कथा आधारित आहे.
दरम्यान विक्रांतच्या या निर्णयाने काही चाहत्यांना धक्का बसला आहे मात्र, तो लवकरच पुनरागम करेल असाही आशावाद अनेकांनी व्यक्त केला आहे.